धर्म, जात, लिंग यामध्ये वाटले गेलेलो असल्यानो कोणीही आपल्यात फूट पाडण्यात यशस्वी होतो. एकता राहिलेली नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे देशद्रोही ठरविले जात आहेत. याउलट त्यांना उत्तर न देणारे देशद्रोही असतात, असे मत तुषार गांधी यांनी मांडले.

विचार जागर मंच आणि कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय यांच्या वतीने रविवारी येथे आयोजित तिसऱ्या मार्क्‍स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलनात तुषार गांधी यांनी महात्मा गांधी, आंबेडकरांपासून राष्ट्रवादापर्यंत आपले विचार मांडले. आपला राष्ट्रवाद भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान किंवा सीमेवर वातावरण तंग असतानाच दिसून येतो. गांधी आणि आंबेडकर यांच्यात मतभेद होते, परंतु त्याला शत्रुत्वाचे नाव त्यांच्या अनुयायांनी दिले. गांधींच्या हट्टामुळे आंबेडकरांनी पुणे करार केला, असा गैरसमज आहे. याचबरोबर गांधींना बाबासाहेब देशाला बांधून ठेवण्यासाठी सक्षम असल्याचा विश्वास होता. शंभर वर्षांपूर्वी मार्क्‍स, गांधी, आंबेडकर हे ज्यासाठी लढत होते ती लढाई अजूनही सुरूच आहे. भाषण देणे आणि भाषण ऐकणे हा वेळेचा अपव्यय आहे. ज्या समाजात फक्त द्वेष असेल तर ते राष्ट्र कसे असू शकते? आंबेडकरांना गांधींचा द्वेष असता तर त्यांच्या खुन्याचा खटला ऐकायला कधीच गेले नसते. त्यांच्या विचारांचा विरोध द्वेष कधीही बनला नाही, असे तुषार गांधी यांनी नमूद केले.

विचारमंथनाचे स्वागताध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी प्रास्ताविकात संमेलन आयोजनामागील भूमिका सांगितली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष  श्रीपाद जोशी यांनी मागील दोन विचारमंथन संमेलनांचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब कसबे, साहित्यिक उत्तम कांबळे हेही उपस्थित होते.

दरम्यान, आपण फक्त स्वाभिमानी आंबेडकर बघितले आहेत, ते किती नम्र होते हे आपणास माहीत नाही, असे विचारमंथनाच्या पहिल्या सत्रात डॉ. कसबे यांनी सांगितले. बाबासाहेब जेव्हा राजकीय निर्णय घेत, तेव्हा जाहीर सभा घेऊन लोकांचा निर्णय देखील घेत असत. हे आजच्या राजकारण्यांनी शिकावे, असे आवाहनही त्यांनी केले. गोपाळ गुरव यांनी दुसऱ्या सत्रात मूलतत्त्ववाद निरंतर असतो, तो बदलविण्याची मुभा नसते. त्यामुळे त्याचे पालन सर्वाना करावेच लागते, असे मांडले. अन्वर राजन यांनी तिसऱ्या सत्रात गांधीजी धार्मिक होते, परंतु मूर्तीपूजा करण्यावर त्यांचा विश्वास नव्हता, हे सांगितले. कोणत्याही धर्माची स्थापना विनाकारण होत नाही. सुरुवातीच्या काळात धर्म मागासलेले होते, त्यावेळी समाजात विषमता होती. धर्माची चिकित्सा ही त्या वेळेवर ठरत असते. मूलतत्ववादाची भूमिका नेहमी चुकीचीच असते असे नाही, असेही त्यांनी नजरेस आणून दिले. चौथ्या सत्रात ‘मूलतत्त्ववादाच्या बळी महिला’ या विषयावर डॉ. शशिकला रॉय यांनी पुरुष घराच्या बाहेर जाऊन भांडतात, तर स्त्रिया घरात भांडतात, असे नमूद केले. समर्पण, नैतिकता हे फक्त स्त्रियांवर लादले जातात. बलात्कार पुरुष करतात, परंतु चारित्र्यहीन स्त्रिया होतात, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. भालचंद्र कांगो यांनी ‘मूलतत्ववादाच्या विरुद्ध मार्क्‍सवादाचा संघर्ष’ या विषयावर वर्चस्ववाद म्हणजेच मूलतत्त्ववाद असल्याचे मत मांडले. मनुष्याचा स्वभाव त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीवरुन ठरत असतो, असे ते म्हणाले. उत्तम कांबळे यांनी आपण प्रत्येक कामासाठी वेळ घालवतो परंतु विचारांसाठी आपल्याकडे वेळ नसतो, असे सांगितले. असुरक्षित, संवेदनशील काळात मार्क्‍स, गांधी, आंबेडकर यांचे विचार संमेलन का घ्यावे लागते, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या तीन महानायकांना एकमेकांचे शत्रु ठरविले गेले आहे. तसे असते तर बाबासाहेबांनी मार्क्‍सची तुलना बुद्धांसोबत केली नसती. ज्यावेळी अस्पृश्यांसाठी गांधीजींनी राष्ट्रीय शाळा बांधल्या, याचवेळी बाबासाहेब राष्ट्रीय पातळीवर वसतीगृह काढत होते.  प्रश्न हे एकटेच संपत नसतात, असेही त्यांनी सांगितले.