महात्मा गांधी हत्या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वाचवण्यात आलं. सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी फक्त सावरकरांना वाचवण्यासाठी युक्तिवाद केला असं खळबळजनक वक्तव्य महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केलं आहे. नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. डॉ नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत ‘महात्मा गांधी से गौरी लंकेश तक, राजकीय हत्याओ का सनातन सत्य’ या विषयावर तुषार गांधी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना त्यांनी काही धक्कादायक वक्तव्यं केली. महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “नथुराम गोडसे काही ठराविक विचारांचा बळी पडला होता. त्याच्या बचावासाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही. मात्र सावरकरांचा बचाव करण्यात आला. महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीत बचाव पक्षाच्या वकिलांनी कायदेशीर युक्तिवाद सावरकरांना वाचवण्यासाठी वापरला. नथुराम तसंच इतरांना वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न झाला नाही”.

आपल्या म्हणण्याला आधार देताना तुषार गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होता याविषयी कपूर कमिशनच्या अहवालात नोंद आहे अशी माहिती दिली. तसंच हत्येचा तपास योग्यरित्या झाला नसल्याने तो पुन्हा केला दावा यासाठी गतवर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

महात्मा गांधी यांच्या हत्येदरम्यान जी प्रणाली वापरण्यात आली होती, तीच प्रणाली नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येवेळी वापरण्यात आली असा दावा तुषार गांधी यांनी यावेळी केला.