परीक्षेत नापास होण्याची मालिका कायम राहील, या भीतीने परीक्षेस न बसण्यासाठी तसेच पालकांची सहानुभूती मिळण्यासाठी स्वत:ला भाजून घेण्याचा प्रकार पोलिसांच्या अभ्यासपूर्ण तपासामुळे उघडकीस आला आहे. टीव्हीवरील मालिकांची शक्कल लढवून या मुलीने स्वत:च्या जीवनातही तसा प्रयोग करण्याचा केलेला प्रयत्न तिच्या चांगलाच अंगलट आला आहे. ती २५ टक्के भाजली आहे, तर या प्रकरणाचा छडा लावण्यात वरिष्ठ पोलीस अधिका-यांचीही रात्र आरेवाडीच्या माळावरच घुमली.
कराड तालुक्यातील आरेवाडी येथील कष्टकरी शेतकरी कुटुंबातील १५ वर्षीय शाळकरी मुलगी गतवर्षी इयत्ता आठवीमध्ये नापास झाली होती. येत्या २ एप्रिल रोजी तिची चालू वर्षांची परीक्षा होती. मात्र, त्यातही गणित व इंग्रजीसह अन्य विषयात नापास होण्याची तिला जणू खात्रीच होती. परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा आत्मविश्वास गमावलेल्या या शाळकरी मुलीने आई-वडील रागावणार म्हणून स्वत:ला भाजून घेण्याचा काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घराशेजारीच घडवून आणलेला प्रकार तिच्या पूरता अंगलटी आला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या मुलीला कृष्णा रूग्णालयात भाजलेल्या स्थितीत उपचारार्थ दाखल करण्यात आले. या वेळी पोलिसांना दिलेल्या माहितीत जखमी मुलीने तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन तरूणांनी आपल्याला घरात एकटे गाठून झटापट केली. त्यातून आपण सुटका करून घेऊन बाहेर पळालो. त्यावेळी या दोघांनी अंधाराचा फायदा घेवून आपल्याला पेटवून दिले व डोंगराकडेला पळ काढल्याचे सांगितले. यावर हा प्रकार गांभीर्याने घेऊन कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन जगताप यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना घटनास्थळी धाडले. कराडचे पोलीस उपअधीक्षकही घटनास्थळाकडे धावले. निवडणुकीत ही घटना पोलिसांच्या नामुष्कीची ठरेल की, काय अशी भीती होती. मात्र, सदर मुलीने दिलेली माहिती आणि घटनास्थळावरचा आढावा यातून विविध अंगाने केलेल्या तपासाअंती सदर मुलीने टीव्हीवरील मालिकांच्या कल्पनातून हा सारा बनाव केल्याचे उघड झाले. स्वत:ला भाजून घेऊन पालकांच्या सहानुभूतीसह परीक्षेला दांडी मारण्याचा प्रयत्न करणारी ही मुलगी २५ टक्के भाजल्याने तिची प्रकृती काहीशी गंभीरच असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, या शाळकरी मुलीच्या बनवाबनवीत वरिष्ठ पोलीस अधिका-यांसह कर्मचा-यांची अवघी रात्र या तपासात निघून गेली.