महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर त्यांच्या विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. त्यांनी मध्यंतरी आयुष्य सकारात्मक पद्धतीने कशाप्रकारे जगावे, हे सांगण्यासाठी शेअर केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता त्यांनी मुंबईमध्ये सोमवारी पार पडलेल्या किसान मोर्चा संदर्भात एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केल्याचे दिसत आहे. आपल्या ट्विटसोबत त्यांनी जोडलेले २ फोटोही अतिशय समर्पक असून या ट्विटला नेटीझन्सकडून मोठी पसंती मिळत आहे.

महिंद्रा म्हणतात, सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने तो कामासाठी प्रेरणादायी गोष्टी शेअर करण्याचा असतो. मात्र आज मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये चालत आलेले ३५ हजार शेतकरी हे खऱ्या अर्थाने प्रेरणा देणारे आहेत. या मोर्चामध्ये असणारे वयस्कर लोक आणि त्यांचे अनवाणी पाय पाहून काही उपदेश द्यावा असे वाटत नाही. त्यांचा निर्धार हे प्रेरणेचे उत्तम उदाहरण आहे. महिंद्रा यांच्या या ट्विटला ५ हजारांहून अधिक जणांनी लाईक केले असून जवळपास २ हजार जणांनी ते रिट्विट केले आहे. त्यामुळे महिंद्रांचे सोशल मीडियावरील अस्तित्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि मंत्रीगटाची बैठक संपल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या मोर्चाला अभूतपूर्व पाठिंबा मिळाला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह सर्व राजकीय पक्षही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले. अत्यंत शिस्तबद्ध मोर्चामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.