करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा स्राव घेण्यात आल्यानंतर त्याचे विलगीकरण न करता घरी सोडण्यात आले. आता तब्बल बारा दिवसांनंतर अहवाल निघाला असून ती व्यक्ती करोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. ही व्यक्ती गेली बारा दिवस गावभर फिरत असल्याने आता बेलापूरगावातील अनेकांचे धाबे दणाणले आहे. आरोग्य विभागाचा गलथान कारभार त्या निमित्ताने पुढे आला आहे.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी, सरकारी रुग्णालयात स्राव तपासणीचे नमुने घेण्यात आले पण मोठय़ा प्रमाणात अहवाल प्रलंबित आहेत. दहा दिवसांनंतर अहवाल येत असल्याची टीका केली होती. आज एका करोनाबधितांचा अहवाल तब्बल बारा दिवसांनंतर आल्यामुळे त्यांच्या तक्रारीला दुजोरा मिळाला आहे. आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे हे करोनाबाधित रुग्णाचे विलगीकरण न करता घरी कसे सोडले याचा खुलासा करू शकले नाहीत. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अद्याप चौकशीचे आदेशही दिलेले नाहीत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, पुणे येथे जाऊन आलेल्या  बेलापूर येथील एका तरुणाला करोनाची बाधा झाली होती. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचे स्राव तपासणीसाठी दि. ६ रोजी घेण्यात आले. बारा दिवसांनंतर या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा प्रकार गावात कळताच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान हा तरुण बाजारपेठेत राहतो. त्याच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आहे.

आज तालुक्यात चार करोनाबाधित आढळून आले. त्यात अशोकनगर व बेलापूर येथील प्रत्येकी एक तर शहरातील दोघांचा समावेश आहे. काल रात्री सहा जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. तालुक्यात आतापर्यंत ७६ जणांना करोनाची बाधा झाली आहे. संत लूक रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये ३३ जनावर उपचार सुरू आहे. तर १९ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, बेलापूर येथील करोनाबधित व्यक्तीचा स्राव घेण्यात आल्यानंतर त्याचे विलगीकरण न करता घरी सोडण्यात आले. त्याबाबत चौकशी करावी, अशी मागणी सुनील मुथा यांनी केली आहे.