करोनामुळे आज (सोमवार) यवतमाळ शहरात एका वृध्दाचा मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबळींची संख्या  एकूण संख्या आता  १२ वर पोहचली. तर,आज  दिवसभरात आठ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझिटिव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या आठ जणांपैकी यवतमाळ शहरातील एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर इतर सात जणांमध्ये यवतमाळ येथील एक पुरुष आणि उर्वरीत सहा जण दिग्रस येथील असुन यामध्ये तीन महिला व तीन पुरुष आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यात सध्या उपचार सुरू असलेल्यांची संख्या ६७ होती. यामध्ये आज आठ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या ७५ वर गेली होती. त्यापैकी  एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या आता ७४ झाली. तर, ‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या तीन जणांना विलगीकरण कक्षातून सुट्टी देण्यात आल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७१ झाली आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ९६ जण भरती आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२९ वर पोहचली आहे. यापैकी २४६ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली, तर जिल्ह्यात आतापर्यंत १२ जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ५ हजार ९८२ नमूने प्रयोगशाळेत पाठवले असुन, यापैकी ५ हजार ४२७ अहवाल प्राप्त, तर ५५५ अहवाल अप्राप्त आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ९८ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान यवतमाळ शहरातील सहा प्रतिबंधित क्षेत्रात जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यवतमाळ शहर पुन्हा करोना संसर्गाच्या रडारवर येत आहे. त्यामुळे शहरात प्रतिबंधित क्षेत्राची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी शहरातील गुरुदेव नगर, नेताजी चौक, दत्त मंदीर वडगाव, तायडे नगर, रचना सोसायटी, कन्यका सोसायटी या प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली.

टाळेबंदीत थोडी शिथिलता मिळाल्यामुळे नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. प्रशासनाच्या सुचनांचे गांभिर्य त्यांना दिसून येत नसून नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. त्यामुळे नागरिकांनीही जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. कोणताही निष्काळजीपणा स्वत:च्या तसेच दुस-याच्या जीवावर बेतू शकतो. नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे कोटेकोरपणे पालन करावे. अनावश्यक बाहेर फिरू नये, तसेच कुठेही गर्दी करू नये. बाहेर जातांना नियमित मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, तहसीलदार कुणाल झाल्टे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा आदी उपस्थित होते.