यवतमाळ शहरात गेल्या एक महिन्यापासून करोना संसर्गाची लागण थांबली असताना जिल्ह्यात ग्रामीण भागत रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दारव्हा, नरे ही शहरं करोनाचे नवे ‘हॉटस्पॉट’ ठरत आहेत. आज मंगळवारी दारव्हा येथील एका ६० वर्षीय पुरूषाचा करोना संसर्गाने घरीच मृत्यू झाला असून शहरातील तब्बल १२ जणांना करोनाची लागण झाली. यात बालकांसह तरूणींची संख्या लक्षणीय आहे. गेल्या तीन दिवसात करोनामुळे चौथा बळी गेल्याने दारव्हा शहरात भयाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील मृतांची संख्या सातवर गेली आहे.

घरीच प्रकृती बिघडल्याने दारव्हा येथे आज मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यूपश्चात घशातील स्वॅबचे नमुने घेऊन तपासणी केला असता हा व्यक्ती करानोबाधित आढळला. दरम्यान, आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सहा पुरुष आणि सहा महिलांचा समावेश आहे. यात ७० आणि ६६ वर्षीय पुरुषांसह सहा व सात वर्षीय तसेच १२ वर्षीय दोन मुलगे तर ४६ आणि ३५ वर्षीय दोन महिलांसह २३, २१ आणि १६ वर्षीय तरूणींसह एका १२ वर्षीय बालिकेचा समावेश आहे. हे सर्वजण दारव्हा येथील रहिवासी असून ते यापूर्वी पाझिटिव्ह आलेल्या रूग्णाच्या निकटच्या संपर्कातील आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४४ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १९७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून १४६ जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. दारव्हा येथील करोना संसर्गाची परिस्थिती चिघळल्याने जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आज मंगळवारी दारव्हा शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात भेट देऊन आढावा घेतला. पुढील १४ दिवस आपण स्वत: दारव्हा येथे दररोज उपस्थित राहून शहरातील परिस्थिती हाताळणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आतापर्यंत सात करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी चार रुग्ण अगदी शेवटच्या क्षणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले. तसेच दोन जणांना वैद्यकीय महाविद्यालयात आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर आज दारव्हा येथे एकजण घरीच दगावला. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांना या रुग्णांवर उपचाराची संधीच मिळाली नाही. परिणामी या सात करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी लक्षणे दिसताच रूग्णालयात प्रकृती दाखवा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले आहे.