News Flash

कोल्हापूरमध्ये चर्चजवळ दगडफेक

जखमींना बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ४ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत.

कोल्हापूरातील चंदगड येथे प्रार्थनेसाठी गेलेल्या ख्रिश्चन धर्मियांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ज्या चर्चमध्ये ते प्रार्थनेसाठी गेले होते त्या चर्चवर दगडफेक, बिअरच्या बाटल्या फेकण्यात आल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेले ४ जण आयसीयूत उपचार घेत आहेत. या गंभीर घटनेची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी ५ पथके बेळगाव आणि कर्नाटकातील इतर ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी रविवारच्या प्रार्थनेवेळी ही घटना घडली होती.

सुत्रांच्या माहितीनुसार, रविवार, २३ डिसेंबर २०१८ रोजी कर्नाटक सीमेजवळील चंदगडमधील ‘न्यू लाइफ फेलोशिप’ या चर्चमध्ये ४० ख्रिश्चन धर्मिय प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. यावेळी दुचाक्यांवर आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारी, बिअरच्या बाटल्या आणि दगडफेक करीत हल्ला केला. या हल्ल्यात १० ते १२ लोक जखमी झाले आहेत. जखमींना बेळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ४ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत.

नाताळाच्या दोन दिवस आगोदर चर्चमध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सामुहिक प्रार्थना सुरु होती. प्रार्थना सुरु झाल्यानंतर ४५ मिनिटांनी येथे दगडफेक झाली. एक पीडित अंजूम मुट्टेकर यांनी सांगितले की, सुमारे १५-२० लोक दुचाकींवर आले होते. त्यांच्याजवळ लोखंडी रॉड आणि तलवारींसारखी हत्यारे होती. या हल्लेखोरांनी सुरुवातीला चर्चच्या इमारतीवर दगडफेक केली त्यानंतर ते चर्चमध्ये घुसले. आणखी एक पीडित अमित भोसले म्हणाले, या लोकांनी आमच्यावर हल्ला करण्यापूर्वी धर्मांतराच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचा आरोप केला. सुमारे अर्धा तास आमच्यावर हल्ला होत होता. पोलिसांना खबर मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. हल्ल्याच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या बेंजामिन दुत्नी यांनी सांगितले की, हल्लेखोर ज्यावेळी तिथून निघाले तेव्हा त्यांनी हिंदीमध्ये आम्हाला धमकावत पुढील रविवारपासून चर्चमध्ये दिसता कामा नये असे सांगितले.

दरम्यान, एका सामाजिक संघटनेचे शिबू थॉमस यांनी दावा केला की, देशभरात या वर्षी चर्चमध्ये प्रार्थनेदरम्यान अशा प्रकारचे ४४५ हल्ले झाले आहेत. गेल्या अडीज वर्षात अशा १३०० तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या चर्चमध्ये गेल्या २१ वर्षांपासून अशा प्रकारे प्रार्थना होत आहे. मात्र, कधीही कशाचीही तक्रार आली नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 3:14 pm

Web Title: twelve people injured as mob attacks church in kolhapur
Next Stories
1 दाऊदच्या गँगस्टरला 20 वर्षांनंतर मुंब्रा येथून अटक
2 5 जानेवारीला सरकारी अधिकारी संपावर
3 छगन भुजबळांनी मनुस्मृतीचं केलं दहन
Just Now!
X