महापुरामध्ये जिल्ह्य़ातील २०१ दुधाळ जनावरांसह ३४६ जनावरे मृत्युमुखी पडले असून २१ हजार कोंबड्यांचाही बळी गेला आहे. तर ,२६ जणांचा मृत्यू झाला असून एक जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी दिली. सानुग्रह अनुदानापोटी १४ हजार ५०० कुटुंबांना ७ कोटी २१ लाखाचे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

महापुराचा सांगली शहरासह जिल्हयातील १०२ गावांना तडाखा बसला असून आतापर्यंत ब्रम्हनाळच्या दुर्घटनेसह २६ जणांचा बळी गेला आहे, तर एक जण बेपत्ता आहे. तर या महापुरामध्ये २०१ गाई, म्हशींचा मृत्यू झाला असून  ६४ शेळ्या-मेंढ्या, ३ घोडे, बल, ७८ वासरे आणि २१ हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. जिल्हयात पुरामुळे ७३ लाख ७६ हजार रुपयांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे,  तर ४३३ घरे जमीनदोस्त झाली असून २ हजार ९९७ घरांचे अंशत नुकसान झाले आहे.

महापुरामुळे ६४ हजार ६४६ कुटुंबातील ३ लाख ५ हजार ९५७ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये वास्तव्यास असलेले नागरिक घरी परतत असून घरे सुस्थितीत आहेत की नाही हे पाहूनच त्यांनी घरात वास्तव्य करावे. जर घराची स्थिती धोकादायक असेल तर त्यांच्या वास्तव्यासाठी पर्यायी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल,असे सांगून बचाव कार्यासाठी आलेली राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची बोळवण करण्यात आली आहे. महापुराच्या संकटात बचाव कार्यासाठी २० बोटींसह १७६ जवान सांगली जिल्हयात आले होते. विविध संस्थांसह जिल्हयात २३७ वैद्यकीय तज्ज्ञ पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल झाले असून यापकी १३३ महापालिका क्षेत्रात आणि १३४ ग्रामीण भागात कार्यरत आहेत असेही त्यांनी सांगितले.

शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला असून शहरातील ६० हजार ८८९ पूरबाधित ग्राहकापकी ५७  हजार ६४२ ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागातील ४१ हजार ७२९ पकी ३१ हजार १० ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. शहरातील १०० एटीएम पुरामुळे बंद पडली होती, ती तत्काळ सुरू करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असून  चलन मुबलक प्रमाणात असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या सोईसाठी पूरबाधित गावांमध्ये सुट्टी दिवशीही बँका सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

महापुरामुळे जिल्हयातील ६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकाचे नुकसान झाले असून यामध्ये ऊस, सोयाबीन, हळद या पिकांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. विविध सामाजिक संस्था, दाते यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत येत असून जिल्हा कार्यालयात यासाठी कक्ष उघडण्यात आला असून या कक्षामध्ये पूरग्रस्तांना देण्यासाठी कीट तयार करण्यात येत आहे.