करोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत असल्याची दिसून येत असताना राजकीय आरोपाच्या फैरीही जोरात झडत आहेत. करोनाचं संकट उद्भवलेलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते कुठे आहेत? असा सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. त्याचबरोबर साठीच्या वरील लोकांना करोनाचा अधिक धोका आहे. त्यामुळे काळजी घ्या, असा सल्लाही दिला.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याच्या ठरावावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला होता. ‘भाजपाचे कार्यकर्ते विविध माध्यमांतून लोकांना मदत करत असताना राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते कुठे आहेत?,’ असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर देताना चंद्रकांत पाटलांना चिमटेही काढले आहेत.

जयंत पाटलांनी काय दिलं उत्तर?

चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नाला जयंत पाटील यांनी ट्विट करून उत्तर दिलं. “चंद्रकांतदादा, सगळा देश आणि महाराष्ट्र सध्या करोनाच्या विरोधात लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन संदर्भातील धोरणे सर्वांशी चर्चा करून ठरवत आहेत. सर्व लोक त्यांना सहकार्य करत आहेत. अशा वेळी तुम्हाला राजकारण सुचते, याचे मला कौतुक वाटते,’ असं जयंत पाटील म्हणाले.

त्याचबरोबर जयंत पाटील यांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही चंद्रकांत पाटील यांना दिला. “भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करत असतील, तर आनंदच आहे. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काय काम करत आहेत हे बघायचे असल्यास राष्ट्रवादीचे फेसबुक व ट्विटर हॅन्डल वारंवार पाहण्याची सवय लावून घ्या. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन काय काम करत आहेत, हे आपल्याला दिसेल. चंद्रकांत दादा, करोना आजाराचा साठीच्या वरील लोकांना अधिक धोका उद्भवतो. त्यामुळे, आपण जास्त बाहेर फिरू नका. स्वतःची काळजी घ्या. काही कमी जास्त लागलं तर कळवा. मी आहेच ना आपल्या मदतीला,” असा उपहासात्मक सल्लाही त्यांनी दिला.

करोनाचे रुग्ण वाढत असताना चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्यातील ट्विटर वॉर सुरू आहे. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्या प्रश्नाला चंद्रकांत पाटील काय उत्तर देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.