गोंदिया : कारधा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दिघोरी-आमगाव येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासासह द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. आरोपी वसंत विजय रेहपाडे (२०), प्रवीण गंगाराम रेहपाडे (२७) दोघेही रा. दिघोरी आमगाव यांचा समावेश आहे.

२२ एप्रिल २०१६ रोजी अल्पवयीन मुलगी ही तिची लहान बहीण व तिची मैत्रीण हे सर्व घरी असताना पीडित मुलगी हिला गावातीलच तिच्या मैत्रिणीने भेटण्यास बोलावल्याने ती तिला भेटण्याकरिता तिच्याकडे जात असताना आरोपी प्रवीण रेहपाडे यांच्या घरासमोर हजर असलेले प्रवीण, वसंता व एक अल्पवयीन या तिघांनी पीडितेला बळजबरीने प्रवीणच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी पीडितेला प्रवीणच्या घरी नेत असताना शेजारच्या एका अल्पवयीन मुलाने बघितले व त्याने ही माहिती पीडितेच्या आईला दिली. तिच्या आईने तात्काळ प्रवीणच्या घराकडे धाव घेत आवाज दिला असता आरोपींनी तिला घराच्या मागील दाराने जाण्यास सांगून घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी पीडितेने एक दिवस कुणाला काहीही सांगितले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी मुलीने झालेला प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितल्याने त्यांच्या तक्रारीवरून कारधा पोलीस ठाण्यात आरोपी प्रवीण, वसंता रेहपाडे व एका अल्पवयीनच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य  लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. तिघा आरोपींना अटक करण्यात आली. तपासादरम्यान तिन्ही आरोपींविरोधात योग्य व सबळ पुरावे मिळून आल्याने त्यांच्याविरोधात भंडारा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालयात आरोप दाखल करण्यात आले. एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधात बाल न्यायालय भंडारा येथे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून प्रकरण सुरूच आहे. प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांच्या न्यायालयात चालवण्यात आली.

न्यायाधीशांनी आरोपी वसंत रेहपाडे व प्रवीण रेहपाडे यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना २० वर्षे सश्रम कारावास व पीडित मुलीला प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. सरकारच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. दुर्गा तलमले यांनी बाजू मांडली.