23 March 2019

News Flash

१९९ जिलेटीन कांड्या आणि १०० डिटोनेटर्स, डोंबिवलीजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त

स्फोटकं विक्री करण्यासाठी दोन तरुण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी डोंबिवलीजवळच्या खोणी गावात स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. तब्बल १९९ जिलेटीनच्या कांड्या आणि १०० डिटोनेटर्सचा हा साठा आहे. अशोक ताम्हणे आणि मारुती धुळे या दोघांकडून हा साठा जप्त करण्यात आला असून दोघंही कर्जतचे रहिवासी आहेत. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून हा साठा त्यांनी नेमका कशासाठी आणला होता? आणि या दोघांचा दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवायांशी संबंध आहे का? याचा तपास सध्या क्राईम ब्रँचच्या वतीने सुरु आहे.

बेकायदेशीरपणे स्फोटकं विक्री करण्यासाठी दोन तरुण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी संध्याकाळी तळोजा रस्त्यावरील खोणी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. खांद्याला सॅक अडकवून मोटारसायकलवर येणा-या दोन तरुणांवर संशय आल्याने पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे तब्बल १९९ जिलेटीनच्या कांड्या आणि पांढऱ्या रंगाची वायरिंग असलेले इलेक्ट्रीक डीटोनेटरचे १०० नग असे स्फोटक पदार्थ पोलिसांना मिळाले. ही स्फोटकं बाळगण्याचा कुठलाही परवाना त्यांच्याकडे नसल्याने हा साठा जप्त करत पोलिसांनी या दोघांना अटक केली.

First Published on April 16, 2018 3:04 pm

Web Title: two arrested along with explosives in thane detonators gelatin sticks seized