पोलीस रेकॉर्डवर असलेल्या एका गुन्हेगाराने त्याच्या मुंबईच्या मित्रांसोबत बारी कॉलनीमध्ये तयार केलेल्या २०० आणि १०० च्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या. याची किंमत ४४ हजारांच्या घरात आहे. आरोपींकडून पोलिसांनी प्रिंटर आणि स्कॅनरही जप्त केले. आता पर्यंत १ लाखांच्या जवळपास बनावट नोटा आरोपींनी वापरल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात उघंड झाली . या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी शेख हारून (वय -३८, रा. बारी कॉलनी), सय्यद शोहरत अजगर अली (वय २५, रा. मुंबई, हल्लीचा मुक्काम औरंगाबाद) या दोघांना अटक केली आहे. शेख हारुन हा पोलीस रेकॉर्डवर नाव असलेला गुन्हेगार आहे असेही पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्यावर फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. सय्यद शोहरत अजगर अली हा गेल्या साडेतीन वर्षांपासून मुंबईत बनावट नोटा तयार करण्याचे उद्योग करतो.सध्या रहेमानिया कॉलनीत राहतो.आता पर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता.दोन वर्षांपूर्वी जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेने बनावट नोटा पकडल्या होत्या. त्याचे कनेक्शन जालना जिल्ह्यातील अंबड आणि हिंगोली पर्यंत गेले होते.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक शामसुंदर वसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके करत आहेत.