मंगेश राऊत, नागपूर

उपराजधानीत दहशतवादी कारवायांची योजना आखणाऱ्या दोघांना लष्करी गुप्तचर यंत्रणेने (मिलिटरी इंटेलिजन्स) शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. या घटनेने पुन्हा एकदा नागपूर चर्चेत आले आहे. आरोपी हे सातत्याने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.

उपराजधानीतील ब्रम्होस एअरोस्पेस या कंपनीचा वरिष्ठ वैज्ञानिक निशांत अग्रवाल याला ९ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली. त्याने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला ब्रम्होस या सुपरसोनिक मिसाईलचे कोडिंग पुरवल्याचा आरोप होता. या घटनेनंतर शुक्रवारी पुन्हा एकदा नागपुरातून दोघांना दहशतवादी कारवाया व घातपात घडवून आणण्याची योजना आखण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली. दोघेही आरोपी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होते, अशी माहिती समोर येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मिलिटरी इंटेलिजन्सचे काही अधिकारी व कर्मचारी शहरात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गणेशपेठ पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी रात्री ९.१५ च्या सुमारास लष्कराचे काही अधिकारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले व रात्री सव्वा दहा वाजता निघून गेले. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, अधिक माहिती देण्यास नकार दिला.

दिवाळीत घातपाताचा कट?
देशात दिवाळीचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. या काळात नागपुरात घातपात घडवून आणण्याची संशयित दहशतवाद्यांची योजना होती, असे समजते. गेल्या काही दिवसांपासून ते सॅटेलाईट कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या सतत संपर्कात होते, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, लष्कराच्या सावधगिरीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.

अधिक आरोपी असण्याची शक्यता
या कारवाईसाठी शहरात मोठय़ा प्रमाणात संशयित दहशतवादी वास्तव्यास असावेत, असा संशय आहे. मात्र, मिलिटरी इंटेलिजन्सने आतापर्यंत केवळ दोघांनाच अटक केली होती. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.