पालघर : बोईसर येथील ‘मंगलम ज्वेलर्स’ या सराफा पेढीवर दरोडा घालून सात कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणाऱ्या दोघांना पालघर पोलिसांनी अटक केली.
बोईसर येथील चित्रालय परिसरात ३० डिसेंबर २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. शेजारच्या दुकानातून सराफा पेढीत प्रवेश करून चोरटय़ांनी मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पालघर पोलिसांनी १५ पथके स्थापन केली होती. त्यापैकी चार पथके झारखंड, पश्चिम बंगाल आणि नेपाळ येथे तपासासाठी पाठवण्यात आली होती.
दरम्यान, झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३३४ ग्रॅम सोने आणि साडेपाच लाख रुपये रोख असा एकूण साडेएकोणीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दरोडय़ाच्या सूत्रधारासह अन्य काही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी सहा अतिरिक्त पथके स्थापन केली आहेत. पोलिसांची नेपाळ सीमालगतच्या भागांत विशेष पाळत असल्याचे अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 4:31 am