शहरात दोन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्तूल, जिवंत काडतुसासह सहा धारदार शस्त्रे जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. अन्य एक जण फरारी आहे. ही शस्त्रे मध्य प्रदेशातून आणल्याची कबुली आरोपींनी दिली.
शहरातील साखला प्लॉटनजीक ज्ञानेश्वरनगरमध्ये दुचाकीवर दोन युवक संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून रविवारी दुपारी ४ वाजता सापळा रचला. दोन्ही संशयित मनपा शाळेच्या पडक्या खोलीत लपले. पोलिसांनी वेढा टाकून दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु एक जण फरारी झाला. अनिलसिंग नकुलसिंग बावरी (भोईगल्ली झरी) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव असून, रोशनसिंग बादलसिंग बावरी फरारी आहे. अनिलसिंग याची अंगझडती घेतली असता देशी बनावटी पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे आढळून आले. फरारी रोशनसिंगच्या घराची झडती घेतली असता तलवार व चार धारदार खंजीर आढळून आले. ही सर्व हत्यारे रोशनसिंग याने मध्य प्रदेशातून विकण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासमोर रुख्मसिंग हरिसिंग बावरी (झरी) याच्याकडे धारदार खंजीर आढळून आले. या प्रकरणी त्याच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.