स्वतंत्र अस्तित्वाच्या दोन भाजप नेत्यांची कार्यालये आता एकाच ठिकाणी!

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची संपर्क कार्यालये आता एकाच इमारतीत असणार आहेत. खासदार दानवे यांचे संपर्क कार्यालय पूर्वीपासून जालना शहरातील भाजपच्या जिल्हा कार्यालयात पहिल्या मजल्यावर आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर लोणीकर यांचे संपर्क कार्यालय दहा मेपासून सुरू होणार आहे.

दहा मे रोजी खासदार दानवे यांच्या हस्ते लोणीकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार अूसन पक्षाचे जिल्ह्य़ातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहे. मंत्री झाल्यावर लोणीकर यांचे संपर्क कार्यालय त्यांच्या शहरातील निवासस्थानीच होते.

खासदार दानवे आणि लोणीकर भाजपामधील ज्येष्ठ नेते असून त्यांचे जिल्ह्य़ातील स्थान तसेच अस्तित्व स्वतंत्र आहे. दोन वेळेस विधानसभा सदस्य आणि चार वेळेस लोकसभा सदस्यपदी दानवे निवडून आलेले आहेत. परंतु दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात लोणीकर यांच्या परतूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे सर्वसाधारणत: लोणीकर यांचे विधानसभा क्षेत्र असलेले परतूर आणि मंठा हे दोन तालुके वगळूनच खासदार दानवे यांचा वावर असतो. अलीकडे मंत्रिपदामुळे जिल्हाभरातील मंडळी संपर्कात आली असली तरी लोणीकर यांचे खरे कार्यक्षेत्र परतूर आणि मंठा तालुक्यातच आहे.

हे दोन्हीही नेते गेली तीन दशकांपेक्षा अधिक काळ जिल्ह्य़ाच्या राजकीय क्षेत्रात आहेत. दानवे पहिल्यांदा १९८५ मध्ये भोकरदनमधून विधानसभा निवडणुकीत १ हजार ५६८ मतांनी पराभूत झाले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी मैदान सोडले नाही आणि विधानसभेच्या दोन आणि लोकसभेच्या चार निवडणुकांत कधी पराभव पाहिला नाही. १९८५ मध्ये दानवे भोकरदनमध्ये निवडणूक लढविली त्यावेळी परतूरमध्ये भाजपला विधानसभेसाठी उमेदवारही मिळाला नव्हता. परंतु १९९० मध्ये लोणीकर उभे राहिले आणि त्यांचा ५ हजार ९९३ मतांनी पराभव झाला.

पुढील पाच वर्षे जिद्दीने जनसंपर्क ठेवून १९९५ मध्ये लोणीकर पुन्हा उभे राहिले आणि त्यांचा केवळ २२२ मतांनी परतूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला. १९९९ मध्ये लोणीकर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. पुढे २००४ आणि २०१४ मध्ये ते पुन्हा निवडून आले.

सध्या दानवे आणि लोणीकर यांची पुढची पिढी राजकारणात आलेली असली तरी त्या दोघांना मात्र कोणताही राजकीय वारसा नव्हता. जिल्हा आणि संघर्ष हा दोघांचाही स्थायीभाव मानला जातो. दानवे केंद्रीय राज्यमंत्री झाले तरी सर्वसामान्य जनतेच्या गर्दीत राहायची सवय असल्याने तेथे ते रमले नाहीत आणि राज्यात येऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर पहिल्या मंत्रिमंडळात लोणीकर यांची वर्णी लागली नव्हती. पुढील विस्तारात नक्की राज्यमंत्री होणार असे त्यांचे कार्यकर्ते सांगत असतानाच लोणीकर यांना कॅबिनेट मंत्रिपदच मिळाले!

दानवे आणि लोणीकर यांच्यात सख्य नसल्याची उदाहरणे भाजपचे जिल्ह्य़ातील काही कार्यकर्ते अनेकदा देत असतात. दोघांतील मतभेदाच्या घटनाही अनेक वर्षे सांगितल्या जातात. परंतु या दोन्हीही पुढाऱ्यांकडून त्यांची पक्षाच्या बाहेर जाहीर वाच्यता मात्र झालेली नाही.

गेल्याच आठवडय़ात लोणीकर यांनी भोकरदन येथे जाऊन दानवे यांची भेट घेतली. त्यावेळी राजकीय क्षेत्रात तर्क-वितर्क लढविले गेले होते. परंतु आता दोन्ही नेत्यांची कार्यालये एकाच इमारतीत असणार आहेत. वरच्या मजल्यावर दानवे आणि खालच्या मजल्यावर लोणीकर!