19 February 2019

News Flash

खंडणीसाठी चेन्नईच्या दोघा व्यापाऱ्यांचे अपहरण करणारी टोळी जेरबंद

लातूर व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या मोहीम हाती घेतली.

सोलापूर ग्रामीण व लातूर पोलिसांची संयुक्त कारवाई

चेन्नई येथून दोन व्यापाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्याकडून ३० लाखांची खंडणी वसूल करू पाहणाऱ्या सात जणांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलीस व लातूर पोलिसांनी संयुक्त मोहिमेत पकडले. लातूर जिल्ह्य़ातील निलंगा येथे झालेल्या या कारवाईत स्कॉर्पिओ गाडीसह एक पिस्तूल व दोन देशी बनावटीचे कट्टेही सापडले.

किसन ऊर्फ दादाराव मोरे (रा. किनगाव, जि. लातूर), एस. अप्पू स्वामी, श्रीकांत मल्लिकार्जुन स्वामी, दयानंद चव्हाण, मुकेश घोलप, संजय पांडुरंग शिंदे व लक्ष्मण ऊर्फ अनिल राठोड (सर्व रा. लातूर) अशी संशयित गुंडांची नावे आहेत. या कारवाईची माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली. सोलापूर ग्रामीण व लातूर या दोन्ही जिल्ह्य़ाच्या पोलिसांतील योग्य समन्वयामुळे अपहरण व खंडणीचा गुन्हा पाच दिवसात उघडकीस आल्याचे प्रभू यांनी नमूद केले.

चेन्नई येथील व्यापारी एस. सोहनलाल व शशीकुमार हे दोघे व्यापारानिमित्त गेल्या ११ मे रोजी सोलापुरात व नंतर निलंगा येथे गेले होते. तेथील ओळखीचा असलेला बांधकाम व्यावसायिक अप्पू स्वामी याने त्यांना बोलावले होते. मात्र नंतर सोहनलाल व शशीकुमार हे दोघे कोणाच्या संपर्कात आले नव्हते. दुसऱ्या दिवशी, १२ मे रोजी त्यांच्या नातेवाइकांनी लातूर परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच सुमारास त्यांच्या नातेवाइकांना सोहनलाल व शशीकुमार यांचे अपहरण करण्यात आले असूुन त्यांची सुखरूप सुटका हवी असेल तर ३० लाखांची खंडणी द्यावी लागेल, असे धमकीचे फोन येऊ लागले. त्यामुळे अखेर लातूर पोलिसांत याप्रकरणी फिर्याद नोंदविण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी तपास हाती घेतल्यानंतर काही आरोपी सोलापूर परिसरात सोहनलाल व शशीकुमार यांच्या नातेवाइकांना खंडणीची रक्कम आणून द्या, असा वारंवार तगादा लावत होते. त्यामुळे हे खंडणीखोर अपहरणकर्ते सोलापुरातच असण्याची शक्यता बळावली. त्यामुळे ही माहिती लातूर पोलिसांनी सोलापूर ग्रामीण पोलिसांना कळवून सजग राहण्यास सांगितले. पोलिसांना तसा सुगावा लागला. परंतु त्याचवेळी लातूर व परिसरातही आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी चालविला होता. दरम्यान, काल रविवारी सायंकाळी खंडणीखोर अपहरणकर्त्यांनी ३० लाखांची खंडणीची रक्कम घेऊन सोहनलाल व शशीकुमार यांच्या नातेवाइकांना निलंगा येथे उदगीर फाटय़ावर येण्यास सांगितले होते. ही माहिती लगेचच नातेवाइकांनी पोलिसांना कळविली. त्यानुसार लातूर व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरीत्या मोहीम हाती घेतली.

अपहरणकर्ते सोहनलाल व शशीकुमार यांच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लातूर परिसरात ठिकठिकाणी सापळे लावले. पोलिसांचे एक पथक निलंगा येथे उदगीर फाटय़ाजवळ दबा धरून बसले होते. त्यासाठी प्रवासी वाहतुकीच्या टेम्पोचा वापर केला गेला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास अखेर खंडणीखोरांची स्कॉर्पिओ गाडी आली. गाडीतून उतरलेल्या खंडणीखोरांनी सोहनलाल यांच्या नातेवाइकांकडे खंडणीची मागणी केली. तेव्हा लगेचच कोणताही विलंब न लावता पोलिसांनी खंडणीखोरांच्या दिशेने चाल केली. मात्र स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाने पोलिसांची चाहूल लागताच गाडी सुरू करून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी त्याचा पाठलाग करून गाडी अडविली व सर्व सात खंडणीखोर व अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. हिसका दाखविताच सर्व जण शरण आल्याचे पोलीस अधीक्षक वीरशे प्रभू यांनी सांगितले.

First Published on May 18, 2016 1:51 am

Web Title: two business arrested in extortion case