सूचकांच्या सह्या बनावट असल्याने नगर शहर मतदारसंघातील अनिल सुधाकर राठोड व अनिल रामचंद्र पवार या दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी वामन कदम यांनी मंगळवारी बाद ठरवले. हरकत घेण्यात आलेले जनता दलाचे (युनायटेड) उमेदवार सचिन बबनराव राठोड व अपक्ष उमेदवार अनिल गणपत शेकटकर या दोघांचे अर्ज मात्र वैध ठरवले.
त्यामुळे नगरमधून एकूण १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. वरील दोघांसह एकूण चार उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले गेले आहेत. आता उद्या (बुधवार) अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर लगेचच चिन्ह वाटप होईल.
वरील चौघा उमेदवारांच्या अर्जास शिवसेनेचे उमेदवार अनिल रामकिसन राठोड यांनी आक्षेप घेत त्यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचक व त्यांच्या सह्या बनावट असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे निवडणूक अधिका-यांनी चौघाही उमेदवारांना व त्यांच्या दहा सूचकांना हजर राहण्याच्या नोटिसा काढल्या होत्या. तसेच निवडणूक यंत्रणेमार्फत सूचकांच्या पत्त्यावर जाऊन, सह्यांबाबत खातरजमा केली. सुनावणीवेळी अनिल सुधाकर राठोड अनुपस्थित होते. त्यांच्या पाच सूचकांनी अर्जावरील सह्या आपल्या नाहीत, असे जबाब दिले. तर अनिल रामचंद्र पवार यांचेही ५ सूचक बनावट आढळले. त्यांनीही सह्या आपल्या नसल्याचे सांगितले. सचिन राठोड व अनिल शेकटकर यांचे सूचक मात्र खरे आढळले.
उमेदवार राठोड यांच्या वतीने अ‍ॅड. मंगेश दिवाणे व निवडणूक प्रतिनिधी सतीश धाडगे यांनी बाजू मांडली तर सचिन राठोड व इतरांच्या वतीने अ‍ॅड. प्रसन्न जोशी यांनी बाजू मांडली.