जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी रात्री दाखल दोन करोना संशयित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. वृध्देचा मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे तर ३३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू हा ‘अल्कोहोल सिडरेंम’ मुळे झाला आहे. दोघांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना करोना संशयित कक्षात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, जिल्हा सामान्य रूग्णालय हे ‘कोविड-१९’ रूग्णालय म्हणून घोषित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच जळगावमधील एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला असतांना नव्याने एकाचवेळी दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सायंकाळपर्यंत अहवाल आलेला नव्हता. जिल्ह्य़ात आतापर्यंत करोनाचे दोन रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, जिल्हा सामान्य रुग्णालय हे कोविड-१९  (करोना रुग्णालय) रूग्णालय म्हणून घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत जाहीर केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सद्य:स्थितीला दाखल रुग्णांपैकी ज्यांना घरी सोडणे शक्य असेल अशा रुग्णांना परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येईल. तथापि, जिल्हा सामान्य रुग्णालयापासून रुग्णांना त्यांच्या घरापर्यंतच्या भाडय़ाची रक्कम स्वत: द्यावी लागेल. ज्यांना घरी सोडणे शक्य नसेल अशा रुग्णांना डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. जिल्हा रूग्णालयातील रुग्ण स्थलांतरीत आणि घरी सोडल्यानंतर रुग्णालयात करोनाचे संशयित आणि सकारात्मक रुग्ण दाखल करून घेण्याआधी संपूर्ण रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून घेण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी संबंधितांना दिल्या. याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे आदी उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात १२३ करोना संशयित दाखल असून त्यापैकी ९४ जणांचे अहवाल नकारात्मक आहेत. शनिवारी करोनाची लक्षणे आढळल्याने दोन रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच त्यांचा रात्री मृत्यू झाला. हे दोघेही करोनाचे संशयित रूग्ण होते. त्यांचा तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नव्हता.

– डॉ.भास्कर खैरे, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता