घरगुती भांडणाच्या तक्रारीचा अहवाल तहसील कार्यालयास देताना सोबत न येण्यासाठी आणि अहवाल परस्पर सादर करण्यासाठी चार हजाराची लाच घेणाऱ्या उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या महिला तक्रार निवारण कक्षातील दोन महिला हवालदारांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रविवारी रंगेहाथ पकडले.
उस्मानाबाद तालुक्यातील वरवंटी येथील पाकिजा मोईन काझी यांनी ८ मार्च रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यातील महिला तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधून सासू रुक्साना, नणंद हनिफा मुन्ना काझी आणि फरहाना महमूद काझी या मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दिली होती. तक्रार निवारण कक्षातील महिला पोलीस प्रभावती मिच्छद्र वारे आणि छाया सदाशिव रोंगे यांनी नणंद आणि सासूला ठाण्यात बोलावून घेतले. पाकिजा हिने दिलेल्या तक्रारीनुसार तुमच्यावर कायदेशीर कारवाई करायची आहे. तुम्ही शनिवारी सकाळी ११ वाजता तिघेही पोलीस ठाण्यात हजर रहा, असे सांगितले. त्या तिघी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पाकिजा व तिची आईदेखील तेथे आलेले होते. तहसील कार्यालयात अहवाल पाठवावा लागेल, असे सांगून सासू आणि नणंदेकडून लाचेची मागणी केली.
 रविवारी दुपारी ग्रामीण पोलीस ठाण्यात चार हजार रुपये लाच स्वीकारताना दोघा महिला हवालदारांना रंगेहाथ पकडले.