बीडमध्ये दोन दलित तरूणांना २५ जणांकडून मारहाण करण्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दोन तरूणांनी गाडी ओव्हरटेक केला त्या रागातून ही मारहाण करण्यात आल्याचे समजते. बीडमधल्या सावरगाव येथे हा प्रकार घडला. पीडितांनी केलेल्या तक्रारीत त्यांच्या दुचाकीवर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहून त्यांना ही मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. या तरूणांना पट्ट्याने मारहाण करण्यात आली असून, दोन जखमी तरूणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पंचवीस जणांनी आणखी चार दलित तरूणांना देखील मारहाण केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परंतु, उर्वरित चारही तरूणांनी या गुन्ह्याबद्दल कोणताही जबाब नोंदवला नाही त्यामुळे घडलेल्या पूर्ण प्रकाराची सविस्तर माहिती पोलिसांना समजू शकली नाही. या मारहाण प्रकरणात अद्यापही कोणत्याही आरोपीला अटक केली गेली नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी दिली. दरम्यान, या संपूर्ण प्रकारची दुसरी बाजू देखील समोर येत आहे. ही मारहाण दलित असल्यामुळे केली गेली नसून, केवळ ओव्हरटेक केला या रागातून ही मारामारी झाली असल्याचे देखील कळते आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
गेल्याच आठड्यात दलित अत्याचाराचे पडसाद राज्यसभेत देखील उलटले होते. यावेळी बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी काँग्रेस आणि भाजप पक्षाला धारेवर धरले होते. देशात दलित अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सगळे दलित अत्याचाराविषयी फक्त बोलण्याचे काम करतात अशी टीका त्यांनी केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी गुजरातच्या उनामध्येही दलित तरूणांना मारहाण केलेल्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यातील वातावरण हे चांगलेच तापले होते.