सोलापूर शहर व परिसरात काल मंगळवारी तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत वाढल्यानंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा आणखी वाढत तो ४२.५ अंश सेल्सियसपर्यंत गेला. वाढत्या तापमानामुळे सोलापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. दरम्यान, भर उन्हात काम करताना आणि रस्त्यावरून जाताना अचानकपणे चक्कर येऊन कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. हा उष्माघाताच्या बळीचा प्रकार असल्याचे मानले जाते.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या एनटीपीसीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या कामावरील एका मजुराचा रणरणत्या उन्हात चक्कर येऊन मृत्यू झाला. मलिक कुमार सोमारीबैठा (२६, मूळ रा. हैदरानगर, जि. पालमू, आंध्र प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. तो प्रकल्पस्थळी उंच इमारतीवर काम करीत होता. परंतु उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने त्यास चक्कर आली व तो खाली कोसळला. त्याला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तो मरण पावला. वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील मिरजगी येथे मोटारसायकलवर पाठीमागे बसून भर उन्हात निघालेली एक महिला अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. तिला उपचारासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. जनाबाई कल्लप्पा बनसोडे (४५) असे तिचे नाव आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
शहर व जिल्ह्य़ात तापमानाचा पारा वाढत ४२ अंश सेल्सियसच्या पुढे सरकला आहे. त्यामुळे कमालीचा उष्मा वाढला आहे. सकाळी दहानंतर उन्हाचा तडाखा बसू लागतो. दुपारी रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे. सायंकाळी पाचनंतर रस्त्यावरील वर्दळ वाढली असून दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे नागरिक कटाक्षाने टाळत आहेत.