नगर शहरासह तालुका व परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. वादळाने जिल्हय़ात दोघांचा बळी घेतला असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. मुख्यत्वे घरांवरील पत्रे उडून गेले.
मंगळवारी नगर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने तडाखा दिला. नगर तालुक्यातील खंडाळा येथे खडीच्या खाणीची भिंत कोसळून अण्णा बाळू दातीर (वय ५५) हा रखवालदार आणि राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे उडालेला पत्रा लागून राजेश खाकाळ (वय १२) हा छोटा मुलगा ठार झाला.
नगर शहरासह उपनगर व भिंगार परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. जिल्हय़ाच्या अन्य भागांतही हा पाऊस झाला. पावसापेक्षा वादळाचे नुकसान मोठे असून अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून पडली. भिंगारमधील पोलीस वसाहतीमध्येही अनेक घरांचे पत्रे या वादळाने उडून गेले. सुदैवाने त्यात जीवित हानी झाली नाही.
मंगळवारी प्रामुख्याने नगर तालुक्याला वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. तालुक्यातील जेऊर, कापूरवाडी, रूईछत्तिशी, चिचोंडीपाटील यासह राहुरी, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली.
गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात तापमान प्रचंड वाढले आहे. उकाडय़ाने नगरकर कमालीचे त्रस्त झाले असून दिवसभर होणारी अंगाची लाही लाही आणि घामाच्या धारा यामुळे उकाडा असहय़ झाला असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हवेत सायंकाळनंतर सुखद गारवा निर्माण झाला. मंगळवारी दुपापर्यंतही कमालीची उष्णता होती. शरीरात सारख्या घामाच्या धाराच सुरू होत्या. उन्हाचा चटका फारसा जाणवत नाही, मात्र हवेतील आर्द्रता प्रचंड वाढली असून त्यामुळे घामाच्या संततधारा सुरू आहेत. बुधवारीही शहरात कमालीची उष्णता होती.
ग्रामीण भागातही शेतकऱ्यांना आता पावसाचेच वेध लागले असून गेल्या दोन-तीन दिवसांत जिल्हय़ाच्या काही भागांत पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाळापूर्व मशागतीची कामेही आता उरकली असून सर्वानाच आता पावसाची अपेक्षा आहे.