देशास सध्या करोनानं थैमान घातलं असून त्याविरोधात सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. अशा परिस्थितीत लोकांचं मनोबल उंचावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच विभिन्न मतं असल्याचं पाहायला मिळालं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात एक ट्विट करून आपलं मत व्यक्त केलं आहे. दिव्याच्या माध्यमातून देशाला करोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो, असं रोहित पवार म्हणाले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी मात्र त्यांच्या या निर्णयावर टीका केली. देशाला इतकंही मुर्खात काढू नका असं म्हणत आव्हाडांनी मोदींवर टीका केली होती. तर नरेंद्र मोदी हे चुल पेटवण्यासंबंधी काही बोलतील असं वाटल्याचं मलिक म्हणाले होते.

आणखी वाचा- देशाला इतकंही मुर्खात काढू नका; जितेंद्र आव्हाडांची पंतप्रधान मोदींवर टीका

काय म्हणाले आव्हाड ?
“संपूर्ण देशाला आशा होती की, मोदी जीवनावश्यक वस्तूंबद्दल बोलतील. भारतातील कोणताही गरीब नागरिक उपाशी झोपणार नाही, याबद्दल बोलतील. मास्क, सॅनिटायझर आणि औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. याची कमरता पडणार नाही, याच्यावर बोलतील. आम्ही नवीन लस शोधून काढतोय, याविषयी बोलतील. टेस्टिंग किट कमी पडणार नाही, याच्यावर बोलतील. देशामध्ये निर्माण झालेली परिस्थिती आणि भयग्रस्त झालेल्या जनतेला आधार देतील, असं वाटल होतं. तर त्यांनी आता नवीनच इव्हेंट काढला,” असं आव्हाड म्हणाले होते.

आणखी वाचा- “सोचा था चूल्हा जलाने की बात होगी, साहब दिया जलाने का उपदेश दे गए”

काय म्हणाले मलिक ?
“सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून देशवासीयांच्या हाती घोर निराशा आली आहे. वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील. पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला,” असं म्हणत नवाब मलिक यांनी टीका केली होती.