सततची नापिकी आणि त्यामुळे कर्जाचा वाढता बोजा यामुळे उत्तर महाराष्ट्रातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथे एकाने विषारी औषधाचे सेवन करून, तर जळगावच्या जामनेर तालुक्यात शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दाभाडी येथील रवींद्र अभिमन निकम (३४) या तरुण शेतकऱ्याने शनिवारी सकाळी विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. या प्रकरणी छावणी पोलिसात नोंद करण्यात आली. महसूल यंत्रनेने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रवींद्र यांच्या कुटुंबीयांकडे दाभाडी शिवारात सव्वा एकर शेतजमीन आहे. ट्रॅक्टरसाठी खासगी वित्तीय संस्थेकडून कुटुंबीयांनी कर्ज घेतले होते. तसेच पीक उत्पादनासाठी नातेवाईक व मित्र परिवाराकडून हातउसनवारीने काही रक्कम घेतली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातून उत्पन्न मिळेनासे झाले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच कर्जफेड करणे अवघड बनल्याने रवींद्रने काही शेतजमीन विक्री करून कर्जफेड करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही संपूर्ण कर्जफेड झाली नाही. १० लाखांहून अधिक कर्ज असल्याने रवींद्र विंवचनेत सापडला होता. त्यातूनच त्याने आत्महत्येचा मार्ग अनुसरल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहुर पेठ येथे घडली. प्रकाश मोतीराम घोलप (५६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. घोलप यांची सात एकर जमीन आहे. सोसायटीचे एक लाख ११ हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. शुक्रवारी दुपारी ते घराबाहेर पडले. सायंकाळी उशिरापर्यंत ते परतले नाही. यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शनिवारी सकाळी शेतात जाऊन कुटुंबीयांनी शोध घेतला असता एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. घोलप यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.