पालघर तालुक्यातील राज्याच्या सागरी हद्दीमध्ये १२ नॉटिकल मैल प्रवेश केलेले दोन ट्रॉलर्स मत्स्य व्यवसाय विभागाने पकडले. आज पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वडराइ टेम्भी गावाच्या समोरच्या समुद्रात ६ ते ८ नॉटिकल मैल अंतरावर मुंबई परिसरातील ५० ते १०० ट्रॉलर शिरुन मासेमारी करत असल्याची कुणकुण स्थानिक मच्छीमारांना गेल्या काही दिवसांपासून लागली होती. याबाबत त्यांनी मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रार केली. मुंबई क्षेत्रातील दोन ट्रॉलर्स पकडण्यात यश आले असून हे दोन्ही ट्रॉलर्स सातपाटी बंदरात उभे करण्यात आले आहेत. त्यांच्याकडील माशांचा लिलाव केल्यानंतर त्यांच्याविरूद्ध पालघरच्या तहसीलदारांकडे तक्रार केली जाणार आहे.