नागपूर : राजकारणात कोहीही होऊ शकते असे म्हणतात, याचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्य़ातील एका गावात आला. या गावच्या दोन मित्रांना एकाच वेळी आमदार होण्याची संधी चालून आली. हे गाव आहे यवतमाळ जिल्ह्य़ातील पुसद आणि मित्रांची नावे आहेत नीलय नाईक आणि वजाहत मिर्झा.

विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपने पुसदचे नीलय नाईक यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने याच गावातील वजाहत मिर्झा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. हे दोघे दोन भिन्न राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करीत असले तरी ते चांगले मित्र असून दोघांचेही परस्परांकडील कार्यक्रमात येणे-जाणे आहे. एक डॉक्टर आहेत, दुसरे वकील आहेत. काँग्रेस आणि भाजपकडील संख्याबळ लक्षात घेता या दोघांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. नीलय नाईक हे राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुतणे आहेत. नाईक सुद्धा पुसदचेच आमदार आहेत. त्यामुळे नीलय आणि वजाहत

यांच्या नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुसदमधील आमदारांची संख्या तीनवर जाणार आहे. एकाच गावातील दोन मित्रांना एकाच वेळी आमदार होण्याचा हा योग दुर्मिळ असून त्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हणतात. सध्या हे दोघे मित्र असले तरी भविष्यात ही मैत्री कायम राहावी, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे.