कर्जत : कर्जत तालुक्यात आज वेगळेच तुफान आले. टाकळी खंडेश्वरी गावामध्ये स्थापलिंगच्या डोंगरावर सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या कामावर नानासाहेब शिवाजी वाघमारे व शीतल मोहन पुजारी या दोन पदवीधरांनी श्रमदान करून नंतर विवाह केला. या वेळी राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे हे उपिस्थत होते.

विवाहाच्या सुंदर क्षणाची सुरवात कर्जत तालुक्यातील नानासाहेब व सोलापूर जिल्ह्य़ातील बी कॉम झालेली शीतल यांनी आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली. पाण्याचे महत्त्व भावी पिढीला देतानाच लग्नाचा डामडौल व अनाठायी खर्चाला फाटा देऊन साध्या पद्धतीने पण आदर्श अशी जीवनाची सुरुवात केली. पाच हजार रुपये पाणी फाउंडेशनचे सुरू असलेल्या कामासाठी देणगी म्हणून दिले. या दुर्मीळ अशा कार्यक्रमासा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किरण पाटील, प्रांताधिकारी अर्चना नष्टे आदींसह काम करणाऱ्या महिला, पुरुष  उपस्थित होते.

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी या गावामध्ये आज खंडोबाचे तीर्थ क्षेत्र असलेल्या स्थापलिंग येथे बानुबाई व खंडोबाच्या साक्षीने आज आगळेवेगळे तुफान आले.

‘ गावची साडी’ प्रत्येक महिलेस एक

टाकळी खंडेश्वरी गावकऱ्यांनी श्रमदान करणाऱ्या गावातील महिलांसाठी रोज लकी ड्रॉ ठेवला असून कामावरील महिलांच्या नावाने रोज सोडत घेऊन ज्या महिलेच्या नावाची चिठ्ठी निघेल, त्या महिलेचा साडी देऊन ग्रामस्थ सन्मान करणार आहेत. तसेच या नवविवाहित जोडप्याला श्रीगांेदे येथील अग्निपंख फाउंडेशन यांचे वतीने पाच हजार रुपयांचे संसारोपयोगी भांडी देण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा सुरेखा शेंद्रे, शुभांगी लगड, अमोल गव्हाणे, दिलीप काटे यांनी दिली.