आरोंदा किरणपाणी पोर्टवर झालेली दगडफेक व खासगी प्रॉपर्टीत घुसून केलेल्या नुकसानीबाबत परस्परविरोधी तक्रार झाल्याने पोलिसांनी दोन्ही गटांतील २८ जणांवर अटकेची कारवाई केली. तसेच आरोंदा गावाने आज कडकडीत बंद पाळला.
आरोंदा किरणपाणी पोर्टवर काल सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्यासह स्थायी समिती गेली होती. या वेळी ग्रामस्थांची उपस्थितीचा उद्रेक घडला आणि दगडफेक झाली. दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याने हिंसक वातावरण घडले.
आरोंदात सोमवारी रात्रो उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे पोलिसांनी आरोंदा जेटीचे माजी आमदार राजन तेली, हेमंत कुडाळकर यांच्यासह दहा जणांना तर काँग्रेसच्या संदेश सावंत, सतीश सावंत, डॉ. जयेंद्र परुळेकर अशा १८ जणांना ताब्यात घेतले.
या सर्वाना न्यायालयात हजर केले. काँग्रेसचे अठराही जणांचा न्यायालयाने जामीन नाकारला तर राजन तेलीसह दहाही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
दरम्यान, आरोंदा गावातही कडकडीत बंद पाळण्यात आला. माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही आरोंद्यात जाऊन पोलिसांविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला तर आमदार नीलेश राणे यांनीही काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थांना पाठिंबा दर्शविला.
आरोंदा किरणपाणी पोर्ट विरोधातील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने पोर्टचे भवितव्याकडे सर्वाचे लक्ष आहे.