News Flash

खामगांवमध्ये दोन गटांत हाणामारी

शहरातील शिवाजी नगरात कबड्डी स्पर्धेच्या वादातून दोन गटांमध्ये फेब्रुवारीमध्ये वाद झाला होता.

घटनास्थळावर रात्री पडलेला दगडांचा खच व तैनात पोलीस

चार जण जखमी; काँग्रेस नगरसेवकासह ३१ जणांवर दंगलीचे गुन्हे

अकोला : खामगाव शहरातील शिवाजीनगरात जुन्या वादातून दोन गटांत हाणामारी, दगडफेक व जाळपोळ झाल्याची घटना सोमवारी रात्री १०.४०च्या सुमारास घडली. या घटनेत चार जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेत दोन दुचाकी, एक हातगाडी आणि एका दुकानाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेस नगरसेवकासह सुमारे ३१ जणांवर गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.

शहरातील शिवाजी नगरात कबड्डी स्पर्धेच्या वादातून दोन गटांमध्ये फेब्रुवारीमध्ये वाद झाला होता. सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत पुन्हा हा वाद उफाळून आला. दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली, तसेच जाळपोळ सुरू केली. या घटनेत पोलीस कर्मचारी दिलीप राजपूत, संदीप टाकसाळ यांच्यासह राहुल तिवारी व विनोद महाडिक जखमी झाले आहेत. विनोद महाडिक यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रात्रीच अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दुचाकी, एक हातगाडी आणि एका दुकानाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. पोलिसांनी काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.  खामगाव विभागातील शेगाव, हिवरखेड, जलंब, पिंपळगाव राजा येथील पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली.

या प्रकरणी  नगरसेवक प्रविण कदम, अश्विन खंडागळे, सूरज बोरकर, सूरज साबळे, अनिकेत जवंजाळ,  उमेश कदम, शैलेश सोले, ओम कदम, भवर सर्व रा. शिवाजी नगर, भाऊ ताराचंद बिडकर, रमेश जाधव, सोनू तिवारी, राजेश मिश्रा, सचिन यादव, राहुल ठोंबरे, गोलू मुधोळकर आदींसह अनेकांवर भादंवि कलम १४७, १४८, १४९, ३५३, ३२३, ४२७, ३३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून अश्विन खंडागळे, अनिकेत जवंजाळ, रमेश जाधव, सचिन यादव या चौघांना अटक करण्यात आली आहे. नगरसेवक प्रविण कदम फरार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:57 am

Web Title: two groups clash in khamgaon
Next Stories
1 हप्तेखोरीसाठी दंगल घडवली ; धनंजय मुंडे यांचा आरोप
2 मराठीला अभिजात दर्जा, वाचन संस्कृतीसाठी साहित्य महामंडळ सरकारशी भागीदारीस तयार
3 कर्तव्यनिष्ठेचे ‘दोन शब्द’!
Just Now!
X