बीड : करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्या पाश्?र्वभूमीवर प्रशासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नवीन अडीचशे खाटांचे कोविड केंद्र उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी प्राणवायू असलेल्या ५० खाटा शनिवारपासून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी माजी आमदार सुनील धांडे, सय्यद सलीम, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, शल्यचिकित्सक डॉ.सूर्यकांत गिते, आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांची उपस्थिती होती. मंत्री मुंडे यांनी केंद्रासाठी आवश्यक मनुष्यबळ याचाही आढावा घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भात प्रशासनाला त्यांनी सुचना केल्या. कोविड केंद्र लवकरच सुरू होणार असले तरी पहिल्या टप्प्यात शनिवारपासून पन्नास प्राणवायुयुक्त खाटा कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.