पिकांचे मोठे नुकसान

रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जालना जिल्ह्य़ातील दोनशेपेक्षा अधिक गावांना गारपिटीचा जोरदार फटका बसला. त्यामुळे या गावांतील पिकांचे मोठे नुकसान झाले. या गारपिटीने जिल्ह्य़ात दोन शेतकरी ठार झाले, तर चार शेतकरी जखमी झाले. जालना शहरातही जोरदार गारपीट झाली. दहा-पंधरा मिनिटे झालेल्या या गारपिटीचा जोर एवढा होता की, एवढय़ा कमी काळात जालना शहरातील अनेक भागांत आणि जिल्ह्य़ात गारांचा अक्षरश: थर साचला.

या गारपिटीत नामदेव लक्ष्मण शिंदे (६५, राहणार वजार उम्रद, तालुका जालना) आणि आसाराम गणपत जगताप (६०, राहणार निवडुंगा, तालुका जाफराबाद) या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर मंठा तालुक्यातील अंभोरा शेळके गावातील भगवान विश्वनाथ शेळके हा शेतकरी जखमी झाला. जखमी झालेले अन्य तीन शेतकरी जाफराबाद तालुक्यातील आहेत.

गारपिटीमुळे जवळपास दोनशे गावांतील द्राक्षे, डाळिंब, मोसंबी, कांदा, गहू, हरभरा इत्यादी पिकांचे नुकसान झाले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना परिसरातील वाघरुळ, वंजार उम्रद, गोंदेगाव, सिंदखेड, पोखरी, कुंभेफळ, इंदलरवाडी, धावेडी, धार, नंदापूर, घाणेवाडी, कडचंची इत्यादी गावांना भेटी देऊन गारपिटीने मोडून गेलेल्या पिकांची पाहणी केली. यापैकी काही गावांत तर झालेल्या नुकसानीमुळे शेतक ऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मंठा तालुक्यातील अंभोरा शेळके, देवठाणा, उस्वद इत्यादी गावांचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. गारपिटीत जखमी झालेल्या अंभोरा शेळके गावांतील शेतकरी भगवान शेळके यांची त्यांनी भेट घेतली.

जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले, की जिल्ह्य़ातील १८८ गावांना गारपिटीचा फटका बसला. जालना ५१, मंठा ५५, अबंड ५३, जाफराबाद २२ आणि परतूर ७ याप्रमाणे गारपिटीचा फटका बसलेल्या गावांची तालुकानिहाय संख्या आहे. द्राक्ष, हरभरा, गहू, ज्वारी इत्यादी पिकांना या गावांत गारपिटीचा कमी-अधिक फटका बसला. बीजोत्पादन आणि पिके घेण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या शेडनेटचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले.

जालना शहरात अनेक घरांवरील सोलार पॅनल आणि गाडय़ांच्या काचा गारपिटीने फुटल्या. पावसाचा जोर कमी होता, परंतु गारपिटीचा जोर मात्र अधिक होता. जालना तालुक्यातील वंजार उम्रद, वाघ्रूळ, खेगाव धावेडी, वरखेडा, पोखरी इत्यादी भागात गारपिटीचा जोर अधिक होता. जालना शहरातील सोनलनगर भागात माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी वीजनिर्मितीसाठी बसविलेले सोलार पॅनल गारपिटीने तुटून पडले. कारच्या काचा आणि फायबरचे आच्छादनही फुटले. शहरातील अनेक भागात अशाच प्रकार घडला. हाता-तोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे वाघ्रूळ, वजार उम्राद इत्यादी भागास भेट देऊन आल्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी सांगितले.

१८८ गावांना फटका

जिल्ह्य़ात १८८ गावांना गारपिटीचा फटका बसला. उभी पिके आणि शेड-नेटमधील पिकांचे नुकसान झाले. गारांच्या माऱ्यापुढे शेड-नेट अनेक ठिकाणी टिकाव धरू शकले नाहीत. गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. पुढील ४८ तास गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.-शिवाजीराव जोंधळे, जिल्हाधिकारी न भरून येणारे नुकसान जालना तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या असता आधीच अडचणीत असलेला शेतकरी गारपिटीने आणखी उद्ध्वस्त झाल्याचे दिसले. वाघ्रूळ, उम्रदसह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: अश्रू आले. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. -अर्जुन खोतकर, राज्यमंत्री

येत्या ४८ तासात गारपिटीचा इशारा

जालना-   येत्या ४८ तासात मराठवाडय़ातील काही जिल्ह्य़ात गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जीवित व मालमत्तेची हानी टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे. गारपीट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे, दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, शक्य असल्यास ज्या धान्याची कापणी झालेली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, गारपिटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, गारपीट सुरु असताना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते, त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बीड जिल्हय़ात पिके, फळबागांची नासाडी

बीड : तीन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी जिल्ह्य़ात गारपिटीसह अवेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गारपिटीच्या तडाख्याने रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून फळबागांची प्रचंड नासाडी झाली आहे. दरम्यान रब्बी हंगामातील पिकांकडून शेतकऱ्यांना मोठय़ा अपेक्षा होत्या. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने पिकेही जोमात होती, अशातच अवेळी गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हतबल झाला आहे. जिल्ह्यात जवळपास तीस गावातील क्षेत्र गारपिटीने बाधित झाले आहे.

बीड तालुक्यातील िपपळनेर, वांगीसह गेवराई तालुक्यात खळेगाव, पौळाचीवाडी, बंगाली िपपळा यासह अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून गहू, ज्वारीचेही नुकसान झाले आहे. आमदार लक्ष्मण पवार यांनी विविध ठिकाणी भेटी देत पाहणी केली.  माजलगाव तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. मंगळूर येथील राजेंद्र बापमारे यांच्या शेतातील फळबागांचे मोठे नुकसान झाले.  झाडांवर लगडलेल्या पपयांवर गारांचा मारा झाल्याने त्या गळून पडल्या आहेत. काळेगाव, हिवरा, डुबाथडी, तालखेड,  केसापूरी शिवारातही गहू, ज्वारी, हरभरा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे.

पंचनाम्याचे निर्देश

बीड जिल्ह्यत अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. सकाळीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले.

पंचनाम्याची मागणी

बीड जिल्ह्यतील गारपिटीची माहिती घेतल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

हिंगोलीत हरभरा, गहू, आंब्याचे नुकसान

हिंगोली-  जिल्ह्यतील सेनगाव, वसमत, औंढा नागनाथ, जवळाबाजार, कळमनुरी तालुक्यात काही ठिकाणी हलका गारांचा पाऊस झाला. अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी पिकांना बसला आहे. इंचा येथे गोठय़ावर वीज पडून वासरू मरण पावले. एक जण गंभीर जखमी झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे.

जिल्ह्यत अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या गारांचा पाऊस पडल्याने रब्बी पिकांसह पालेभाज्या, आंब्याच्या मोहोरचे मोठे नुकसान झाले. सेनगाव तालुक्यातील बन बरडा, ताकतोडा, माहेरखेडा, माझोड या भागांत गारा पडल्याने पिकांचे नुकसान झाले. तर इंचा येथे एका शेतकऱ्याच्या गोठय़ावर वीज पडल्याने एक वासरू जागीच मृत्युमुखी पडले. नागसेन हरिभाऊ तपासे हा जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.   शहरातील सुराणानगर भागात कोकाटे या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर वीज पडल्याने घराचे किरकोळ नुकसान झाले. जीवितहानी झाली नाही. रविवारचा पाऊस जिल्ह्यत औंढा नागनाथ, जवळाबाजार, शिरडशहापूर, पिंपळदरी, गोळेगाव, साळणा, जलालदाभा, सुरेगाव, आसोला आदी ठिकाणी झाला, तर हिंगोली शहरात सकाळीच रिमझिम पावसाने सुरुवात केली होती. दुपारी ४ वाजता दमदार पावसाने सुरुवात केली. पाचच्या सुमारास गारांसह पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

उस्मानाबाद, उमरगा तालुक्यास गारांसह पावसाने झोडपले

उस्मानाबाद : मराठवाडय़ात अवकाळीने थमान घातलेले असताना रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यतही अनेक भागात गारांसह पावसाने झोडपून काढले. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा आदी पिकांसह ऊस, द्राक्ष, केळीच्या बागांना पावसाचा जबर तडाखा बसला. तर मोहोराने बहरलेल्या आंब्याचेही मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यत पावसाचा अंदाज शेतकरी बांधून होते. अखेर रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उस्मानाबाद तालुक्यातील तडवळेसह परिसरात जोरदार पाऊस झाला. उमरगा शहरासह तालुक्यातील मुळज, कुन्हाळी, तुरोरी, गुंजोटी, मुरूमसह अनेक भागास मेघगर्जनेसह गाराच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. तर शेतातील उभ्या पिकांनाही पावसाचा जबर तडाखा बसला. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह द्राक्ष, केळी, आंबा आदी  फळबागांचे मोठे नुकसान झाले. सुमारे पंधरा मिनिटे गारांचा पाऊस सुरु होता. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.  तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्याची संधी ना खरीप ना रब्बी हंगामाने दिली. यंदा मुबलक पावसामुळे पिके जोमात असतानाच अवकाळीचा जबर तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.