लष्कराच्या के. के. रेंज या युद्धसराव क्षेत्रात रणगाडय़ांच्या तोफगोळ्यांचा स्फोट होऊन दोन भंगार विक्रेत्यांचा मृत्यू झाला. अक्षय नवनाथ गायकवाड (१९) व संदीप भाऊसाहेब धिरवडे (३२, दोघेही रा. खारे कर्जुने, ता. नगर) अशी दोघा मृतांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिसांनी घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

खारे कर्जुने गाव के. के. रेंज सराव क्षेत्रालगत आहे. या गावासह लगतच्या गावातील तरुण या सराव क्षेत्रात जातात व स्फोट झालेल्या तोफगोळ्यांचे भंगार जमा करतात तसेच न फुटलेले तोफगोळे फोडून त्यातील तांबे, शिसे आदी धातू भंगारात विकण्याचा व्यवसाय करतात. त्यामुळे अनेकदा स्फोट होऊन भंगार विक्रेते मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात.

नगर शहराजवळ, मनमाड रस्त्यावर के. के. रेंज हे लष्कराचे युद्ध सराव क्षेत्र आहे. रणगाडे व लढाऊ चिलखती वाहनांचे सराव या ठिकाणी होतात. तोफगोळ्यांसह क्षेपणास्त्रही डागले जातात. हे क्षेत्र लष्कराने प्रतिबंधित म्हणून जाहीर केले आहे. तोफगोळ्यांचे व इतर स्वरूपाचे भंगार गोळा करण्याच्या कामाचा ठेकाही दिला गेला आहे. तसेच क्षेत्रात लष्कराचे टेहाळणी मनोरेही आहेत. मात्र या सर्वाची नजर चुकून लगतच्या गावातील तरुण या क्षेत्रात जातात. अनेकदा तर नुकतेच फुटलेले तप्त तोफगोळ्यांचे भंगार पोत्यात गुंडाळून आणले जाते. नगरसह राहुरी व पारनेर या तीन तालुक्यातील गावे या सराव क्षेत्रालगत (पान : महाप्रदेश) (पान १ वरून) आहेत. बहुतांशी भाग निर्जन व टेकडय़ांनी वेढलेला आहे.

मंगळवारी सायंकाळी पुन्हा अशाच प्रकारे स्फोटाची घटना घडली. या दोघांनी खारे कर्जुने गावाच्या बाजूने सराव क्षेत्रात प्रवेश केला व न फुटलेला तोफगोळा फोडण्याचा व त्यातील धातू काढण्याचे प्रयत्न केला. त्यातून सायंकाळी पावणेसातच्या सुमाराला खारे कर्जुने ग्रामस्थांनी एमआयडीसी पोलिसांना स्फोट झाल्याची व त्यात दोन जखमी झाल्याची घटना कळवली. सहायक पोलीस निरीक्षक बोरसे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी जखमींना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमाराला याची माहिती शहरात पसरली.

आणखी दोन तोफगोळे निकामी

ज्या ठिकाणी मंगळवारी स्फोटाची घटना घडली, तेथेच जवळ आणखीन फुटलेले दोन तोफगोळे आढळले. एमआयडीसी पोलिसांनी ते निकामी करण्यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांना कळवले. ते लष्कराच्या पथकाने आज, बुधवारी सकाळी निकामी केले. परिसरातील गावातील तरुण अनेकदा स्फोटात मृत्युमुखी पडत असल्याने या संदर्भात लष्कराने व जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.