वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन, सतत गरहजर राहणे, लोकांच्या तक्रारी गांभीर्याने न घेणे आदी कारणांचा ठपका ठेवत बीडच्या तहसीलदार ज्योती पवार, तसेच माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी लता सानप या दोन महिला अधिकाऱ्यांना एकाच दिवशी तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश बजावण्यात आले. राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप सहन न करणाऱ्या दोन्ही महिला अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी करण्यात आल्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांचा बळी घेण्यात आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तहसीलदार ज्योती पवार यांच्या संदर्भात वरिष्ठांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने काही दिवसांपूर्वी निराधारांच्या प्रश्नावरून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. जिल्हा परिषदेच्या मालकी हक्क सांगितलेल्या एका जागेच्या प्रकरणात विरोधात निकाल दिल्यानंतर या जागेसाठी प्रयत्नशील असलेले अनेकजण नाराज झाले होते. त्यातूनच ज्योती पवार यांच्याबाबत विविध तक्रारी वरिष्ठांकडे गेल्याचे सांगितले जाते. परिणामी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, सतत गरहजर राहणे, जनतेशी सौजन्याने न वागणे तसेच सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत विहित वेळेत न पोहोचविणे असा ठपका ठेवून जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी अखेर ज्योती पवार यांना तडकाफडकी निलंबित केले.
दुसरीकडे जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांच्यावर शिक्षण आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांच्यावरही सातत्याने गरहजर राहणे, कामात अनियमितपणाचा ठपका ठेवण्यात आला. सानप यांच्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला, तसेच शिक्षण विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याच वेळी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. या पाश्र्वभूमीवर सानप यांना निलंबित करण्याचे आदेश बजावण्यात आले. त्यामुळे राजकीय हस्तक्षेप नाकारणाऱ्या दोन महिला अधिकाऱ्यांचा तक्रारीनंतर निलंबित करून बळी घेतल्याचे प्रशासकीय यंत्रणेत बोलले जात आहे.