जिल्ह्यात शतकोटी वृक्षलागवड योजना खड्डय़ात अडकली. पंचायत समितीने पूर्वी एक व्यक्ती, दोन वृक्ष अशी घोषणा केली होती. आता ग्रुपिंग पद्धतीने २ लाख रोपे लावण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यास सुमारे १ लाख रोपलागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यासाठी ३१ मेपर्यंत खड्डे खोदण्याच्या सूचना दिल्या होत्या. िहगोली पंचायत समिती खड्डे खोदण्याच्या कामात उत्तीर्ण झाल्याचा दाखला मिळाला असल्याची चर्चा असताना आता प्रत्यक्ष खड्डे आहेत किंवा नाही, याची पाहणी गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाद्वारे प्रत्येक गावात जाऊन केली जाणार आहे.
वास्तविक, जिल्ह्यातील वृक्षलागवडीचा जुना इतिहास लक्षात घेता वृक्षलागवड कार्यक्रम अजून कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावर वृक्षलागवड कार्यक्रमाचा गाजावाजा केला जातो. मात्र, वृक्षलागवडीतील यशापयशाचा धनी कोण, याचा प्रशासनाकडून शोध घेतला जात नाही. पावसाळ्याच्या तोंडावर पालकमंत्री असो वा अधिकारी, त्यांच्या हस्ते रोप लावतानाची प्रसिद्धी यंत्रणेमार्फत केली जाते. जि. प. कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन वृक्षलागवडीसाठी घेतल्यानंतर त्यातून किती निधी उभा राहिला? किती खर्च झाला? किती रोपे जगली? हा संशोधनाचा विषय ठरावा.
िहगोली पंचायत समितीनेच पूर्वी ‘एक व्यक्ती दोन वृक्ष’ अशी घोषणा केली होती. मात्र, त्याचे काय झाले, हे अजून गुलदस्त्यातच आहे. ही घोषणा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या वेळी ग्रुपिंग पद्धतीने दोन लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. तालुक्यात किती खड्डे तयार आहेत याची तपासणी केली जाणार असून, प्रत्येक गावात या पद्धतीने रोप लागवडीचे नियोजन केले आहे. ज्या गावात अधिक मोकळी जागा मिळेल तेथे किमान १ ते २ हजार रोपे लावण्याचे नियोजन आहे. त्यांचे संगोपन करणे सोपे होईल, असा नियोजन करणाऱ्यांचा अंदाज आहे. रोप लागवडीची जबाबदारी विस्तार अधिकाऱ्यावर सोपविली जाणार आहे.