घातपाताचा संशय, दोघे ताब्यात
बुलढाणा जिल्ह्य़ातील धाड शिवारातील गुम्मी शेकापूर जंगलात दोन बिबटय़ांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळले असून, शेतातील तारांमधील विद्युत प्रवाहाचा धक्का लागून त्या बिबटय़ांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून, वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे. धाड जामठी परिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा शेतकऱ्यांना खूप त्रास असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ताराचे कुंपण लावून त्यात विजप्रवाह सोडला आहे. गुम्मी-शेकापूर येथील अशाच एका शेतात दोन बिबटे मृतावस्थेत आढळून आले. दोन दिवसांपूर्वीच त्या बिबटय़ांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून संबंधितांनी त्या बिबटय़ांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या बिबटय़ांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत रविवारी आढळले. वन पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून ते मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचा पंचनामा करून बिबटय़ांचे शवविच्छेदन करण्यात आले.
मृतावस्थेत आढळलेले दोन्ही बिबटे मादी असून, ते मायलेक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातील एक बिबटय़ा साडेचार तर, दुसरा अडीच वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाने या प्रकरणी सखोल चौकशी करून जामठी येथील साहेबराव थोरात आणि रमेश राहुरकर यांच्यावर महाराष्ट्र वन्यजीव प्रतिबंधक कायदा १९७२ चे कलम ९ आणि ३९, ४१, ५१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याशिवाय, महाराष्ट्र वननियमावलीची कलम ९ सुद्धा नोंदविण्यात आली आहे. त्याप्रकरणी वनविभाग चौकशी करीत आहे.
जळालेल्या अवस्थेतील दोन्ही बिबटय़ांचे मृतदेह.