पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर असणा-या शुगर लॉबीवर वचक बसविण्यासाठी नव्या सरकारमध्ये सांगलीला झुकते माप देण्याचा भाजपचा प्रयत्न राहण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या नव्या सरकारमध्ये सांगलीला दोन मंत्रिपदे हमखास मिळण्याची शक्यता असून, यामध्ये शिराळय़ाचे शिवाजीराव नाईक आणि मिरजेचे सुरेश खाडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा राहणार आहे. दिवाळीच्या सुटीमध्ये यासाठी जोरदार हालचाली झाल्या असून, भाजपच्या पदाधिका-यांसह सर्व नूतन आमदारांना तातडीने मुंबईत बोलावून घेण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे चार जागा एकटय़ा सांगली जिल्ह्याने दिल्या असल्याने नव्या मंत्रिमंडळात सांगलीला झुकते माप दिले जाण्याची चिन्हे आहेत. युती शासनाच्या कालावधीत शिवाजीराव नाईक यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले आहेच. पण त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य देशपातळीवर नावाजले गेले असल्याने जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा प्राधान्याने भाजपत विचार करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात भाजपचा झेंडा प्रथम फडकवणा-या सुरेश खाडे यांना ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात जतचे विलासराव जगताप आणि सुधीर गाडगीळ यांना भविष्यात एखादे महामंडळ देण्याचा विचार होऊ शकतो. मात्र सर्वच आमदारांनी मंत्रिपदासाठी जोरदार लॉिबग सुरू केले आहे. कोल्हापूरचे पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर गेलेले चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपद स्वीकारण्यापेक्षा प्रदेशाध्यक्षपद घेण्यास अनुकूलता दर्शविल्याने त्यांचे नाव आपोआपच बाजूला गेले आहे. एक खासदार आणि चार आमदार देणा-या सांगलीला सत्तेत झुकते माप देऊन पश्चिम महाराष्ट्रात असणा-या शुगर लॉबीला नामोहरम करणे हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट आहे.