लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : करोनामुळे आणखी दोन बळी गेल्याची नोंद गुरुवारी अकोल्यात झाली. वाशीम जिल्ह्यातील कारंजा येथील महिला व शहरातील एका वृद्ध पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. आतापर्यंत ५८ जण दगावले आहेत. सोबतच १४ नवीन रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या अकराशेचा टप्पा ओलांडून ११०६ वर पोहचली आहे.

अकोला जिल्ह्यात करोनाचा प्रकोप सुरूच आहे. रुग्ण वाढीसोबतच मृत्यूदर झपाट्याने वाढला. शहरात ६ ते १७ जूनपर्यंत सलग १२ दिवसांत करोनाबाधितांचा दररोज मृत्यू होत आहे. या कालावधीत तब्बल २४ जण दगावले. कालच्या दिवसांत सायंकाळपर्यंत मृत्यूची नोंद झाली नव्हती. मात्र, रात्री दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली. दुर्दैवाने मृत्यूची मालिका मात्र अबाधित राहिली. जिल्ह्यातील एकूण ११० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ९६ अहवाल नकारात्मक, तर १४ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ११०६ झाली. सध्या रुग्णालयात ३२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल (दि.१७) रात्री उपचार घेताना वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यांना १६ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका ७७ वर्षीय पुरुष रुग्णाचा काल रात्रीच उपचारादरम्यान सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला. ते शहरातील हरिहर मंदिर जवळ राहत होते. त्यांना ११ जून रोजी दाखल करण्यात आले होते.

आज दिवसभरात १४ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यात तीन महिला व एक पुरुष आहे. ते शिवसेना वसाहत, शंकर नगर, चांदुर खडकी व खडकी येथील रहिवासी आहेत. आज सायंकाळी १० जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात चार महिला व सहा पुरुष आहेत. त्यातील चार जण बाळापूर, हरिहरपेठ येथील दोन जण, तर उर्वरित गुलजारपुरा, त्रिमूर्तीभवन, जुने शहर, मोठी उमरी येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे.

नमुने घेण्याचे दोन केंद्र वाढले

शहरात नमुने घेण्याचे दोन केंद्र वाढवण्यात आले. शहरातील सिंधी कॅम्प, खदान व अकोट फैल भागात रुग्ण संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अकोट फैल भागातील मनपा आयुर्वेदिक रुग्णालय व खदान भागातील जेतवन नगर बौद्ध विहार येथे नमुने घेण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी संशयितांचे नमुने घेण्यात आले.

७७४१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७७५८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७४३९, फेरतपासणीचे १३३ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे १८६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७७४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ६६३५, तर सकारात्मक अहवाल ११०६ आहेत.

१७ जणांची करोनावर मात
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ७२४ रुग्णांची करोनावर मात केली आहे. करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या १७ जणांचा समावेश आहे. त्यातील १३ जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.