लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून, रुग्ण व मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. जिल्ह्यात आणखी दोन मृत्यू व १४ नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी झाली. आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५५० झाली.
अकोला जिल्ह्यात करोनाचा प्रकोप वाढतच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूच्या प्रमाणातही कमालीची वाढ झाली. आज पुन्हा दोन मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत ७९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २६२ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २४८ अहवाल नकारात्मक, तर १४ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या ३२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण ११०२१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०६६०, फेरतपासणीचे १४४ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २१७ नमुने होते. आजपर्यंत एकूण १०९५२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ९४०२, तर सकारात्मक अहवाल १५५० आहेत.

दरम्यान, काल रात्री दोघांचा उपचार घेतांना मृत्यू झाला आहे. त्यात एक गंगानगर येथील रहिवासी असलेली ७४ वर्षीय महिला आहे. त्यांना १४ जून रोजी दाखल करण्यात आले होते. अकोट येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाला २७ जून रोजी दाखल केले होते. त्यांचाही काल रात्रीच मृत्यू झाला. आज दिवसभरात १४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आज सकाळी नऊ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यात दोन महिला व सात पुरुष आहेत. त्यामध्ये बाळापूर, अकोट येथील प्रत्येकी दोन, तर चिखलगाव, सिंधी कॅम्प, कळंबेश्वार, डाबकीरोड व शिवसेना वसाहत येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालात आणखी पाच रुग्णांची भर पडली. त्यात दोन महिला व तीन पुरुष आहेत. ते मोठी उमरी, जुने शहर, डाबकी रोड, बाळापूर व वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत.
५२ जणांना सुट्टी
करोनातून बरे झाल्याने आज एकूण ५२ जणांना सुट्टी देण्यात आली. सर्वोपचार रुग्णालयातून २८, तर कोविड केअर केंद्रातून २४ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११४५ रुग्णांनी करोनावर मात केली. त्याचे प्रमाण ७३.८७ टक्के आहे.
रुग्णवाढ मंदावल्याने दिलासा
जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये रुग्णवाढ मंदावल्याचे चित्र आहे. आज एकूण २६२ अहवालांपैकी १४ नमुने, तर कालही १९१ पैकी नऊच नमुने सकारात्मक आले होते. सकारात्मक आढळून येण्याचे प्रमाण ५.०७ टक्के आहे. रुग्णवाढीची गती काही अंशी कमी झाल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.