लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनामुळे मृत्यूचे सत्र सुरूच असून आणखी दोन जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९७ रुग्ण दगावले. नव्या करोनाबाधित नऊ रुग्णांचीही नोंद मंगळवारी झाली असून एकूण रुग्ण संख्या १९१० वर पोहोचली. जिल्ह्यात मृत्यूदर वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. करोनाबाधितांचा मृत्यू रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळीचा आकडा शंभराच्या उंबरठ्यावर पोहोचला. जिल्ह्यातील एकूण २६७ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २५८ अहवाल नकारात्मक, तर नऊ अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शासकीय व खासगी रुग्णालयात प्रत्येकी एक अशा एकूण दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली. पातूर येथील ६५ वर्षीय महिला रुग्णांचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना ५ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. दुपारनंतर मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ९७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.

आज सकाळी प्राप्त अहवालात पाच जणांचे अहवाल सकारात्मक आले. ते पाचही पुरुष आहेत. त्यात अकोट, गुलजारपुरा, गंगानगर, लक्ष्मीनगर, करोली चोहट्टा बाजार येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. आज सायंकाळी प्राप्त अहवालानुसार आणखी चार रुग्ण वाढले. त्यात दोन महिला व दोन पुरुष आहेत. कच्ची खोली, बोरगांव मंजू, तेल्हारा व मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
१५९३ रुग्ण करोनामुक्त
आज दिवसभरात सर्वोपचार रुग्णालयातून पाच, कोविड केअर सेंटर मधून ३६, खासगी हॉटेल व रुग्णालयातून तीन अशा एकूण ४५ जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५९३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
८७.२७ टक्के अहवाल नकारात्मक
जिल्ह्यात ८७.२७ टक्के अहवाल नकारात्मक आले आहेत. आजपर्यंत एकूण १४९१२ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे १४४४६, फेरतपासणीचे १५८ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे ३०८ नमुने होते. आजपर्यंत एकूण १४८४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या १२९५२, तर सकारात्मक अहवाल रॅपिड टेस्टचे २१ मिळून १९१० आहेत.