लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनाचे आणखी दोन बळी गेले आहेत. आतापर्यंत १०६ रुग्णांचा मृत्यू झाला. २३ नवे करोनाबाधित रुग्ण गुरुवारी आढळून आले आहेत. काल रॅपिड टेस्टमध्ये सकारात्मक आढळून आलेल्या ३२ रुग्णांचीही आज नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २३०१ वर पोहोचली आहे. दरम्यान, ५८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढतच आहे. करोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. शहरीच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. आज पुन्हा दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण २२४ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २०१ अहवाल नकारात्मक, तर २३ अहवाल सकारात्मक आले आहेत. काल रात्री रॅपिड टेस्टमध्ये ३२ अहवाल सकारात्मक आले. त्याचाही समावेश एकूण रुग्ण संख्येत आज करण्यात आला आहे. सध्या ३३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज दोन रुग्ण दगावले आहेत. त्यात ५२ वर्षीय महिला असून त्या आमीनपूरा अकोट येथील रहिवासी आहे. त्यांना २० जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तसेच ५० वर्षीय महिला असून त्या बोरगाव मंजू येथील रहिवासी आहे. त्या ७ जुलै रोजी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतांना आज मृत्यू झाला.

आज दिवसभरात २३ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळीच्या अहवालातच ते आढळून आले असून त्यात पाच महिला व १८ पुरुष आहेत. त्यातील जिल्हा कारागृहातील नऊ जण, पळसोबढे येथील तीन जण, सिंदखेड येथील दोन जण, तर बोरगांव मंजू, हैदरपुरा खदान, मूर्तिजापूर, रामनगर, पातूर, सरस्वती नगर, नित्यानंद नगर, जीएमसी व सेवरा अकोला येथील प्रत्येकी एक एका रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त ४८ अहवालांत एकही सकारात्मक रुग्ण आढळला नाही. आज दुपारनंतर शासकीय वैद्याकीय महाविद्याालय येथून तीन, कोविड केअर केंद्रातून ३०, मूर्तिजापूर येथून १२, खासगी रुग्णालय व हॉटेल मिळून १३ असे एकूण ५८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील १८५६ जण करोनामुक्त झाले आहेत.
अकोल्यातील मृत्यूदर ४.५६ टक्के
जिल्ह्यामध्ये करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. करोना संसर्गाची बाधा झालेल्या रुग्णांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे मृत्यूदर ४.५६ टक्के झाला असून, राज्याच्या तुलनेत तो अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.