लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू व रुग्ण वाढीचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात शनिवारी करोनाचे आणखी दोन बळी गेले. आतापर्यंत तब्बल ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण व रुग्ण वाढीमुळे जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

अकोला जिल्हा विदर्भातील करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले. विदर्भातील करोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यू अकोला जिल्ह्यातच आहे. करोनाबाधित आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा सातत्याने फुगत आहे. अकोला शहरासह आता ग्रामीण भागातही करोना वेगाने हातपाय पसरतो आहे. अकोल्यातील करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही राज्याच्या तुलनेत अधिक आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ९८५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३१४ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकाने आत्महत्या केली. आतापर्यंत ६२५ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. प्रशासनाने विविध उपाययोजना करूनही अद्यााप करोनावर नियंत्रण मिळवता आले नाही. दररोज वाढणारे मृत्यूचे प्रमाण व रुग्ण संख्या प्रशासनासह नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.