12 August 2020

News Flash

मंगळवेढय़ातील अवैध गर्भपात; आणखी दोन डॉक्टरांना अटक

हे दोघेही डॉक्टर सोनोग्राफी सेंटर चालवितात, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपास यंत्रणेच्या हाती आली आहे.

सोलापूर : मंगळवेढय़ातील डॉ. मर्दा नर्सिग होममधील अवैध गर्भपातप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. दरम्यान, बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉ. श्रीकांत मर्दा यांच्यासह तिघा आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तथापि, या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून यामागे मोठी साखळी कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवेढा पोलिसांनी गेल्या महिन्यात डॉ. श्रीकांत मर्दा यांच्या नर्सिग होमवर छापा घालून त्याठिकाणी चालणाऱ्या बेकायदा गर्भपाताचे प्रकार उजेडात आणले होते. यात डॉ. मर्दा यांच्यासह अन्य दोघा संशयितांना अटक करण्यात आली होती. तसेच कर्नाटकातील एका औषध विक्रेत्यालाही अटक करण्यात आली होती. पोलीस तपासात या प्रकरणाचे धागेदोरे अन्य डॉक्टरांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. त्यानुसार डॉ.विलास दिगंबर सावंत (वय ५०, रा. म्हसवड, जि. सातारा) व डॉ. सुहास बाबर (वय ३८, रा. कडेगाव, जि. सांगली) या दोघा डॉक्टरांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

हे दोघेही डॉक्टर सोनोग्राफी सेंटर चालवितात, अशी प्राथमिक माहिती पोलीस तपास यंत्रणेच्या हाती आली आहे. गेल्या महिन्यात मंगळवेढय़ात येऊन डॉ. मर्दा यांच्या नर्सिग होममध्ये येऊन बेकायदा गर्भपात करून घेणारी एक महिला सातारा जिल्ह्य़ातील होती. तिने सोनोग्राफी कोठे केली, याचा तपास करताना डॉ. सावंत व डॉ. बाबर यांची नावे पुढे आली. हे दोघे डॉक्टर एजंटांमार्फत गर्भवती महिलांना मंगळवेढय़ात डॉ. श्रीकांत मर्दा यांच्या नर्सिग होममध्ये पाठवत होते, असे तपासात आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

डॉ. सावंत व डॉ. बाबर या दोघांना सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड व सांगली जिल्ह्य़ातील येडे येथे छापा टाकून ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्य़ाचा तपास अद्यापि सुरूच आहे, त्यामुळे अटक आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले नाही. दरम्यान, गेल्या शनिवारी प्रमुख आरोपी डॉ. मर्दा यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तर अन्य दोघा संशयित आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 3:25 am

Web Title: two more doctors arrested in illegal abortion case zws 70
Next Stories
1 ‘फेसबुक’च्या माध्यमातून दुर्गम क्षेत्रातील ४४ विद्यार्थ्यांना ‘स्वेटर्स’ मिळाले
2 कराड-चिपळूण रस्त्यावर एसटी बस-मोटारकार अपघातात महिला ठार
3 पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
Just Now!
X