प्रेमात अडसर नको म्हणून तरुणाचा खून केल्यानंतर एका महिलेला त्याचा सुगावा लागला. त्यातून सुरू झालेल्या ब्लॅकमेलला वैतागून तिचा काटा काढण्यात आला. प्रेत जळके (ता.नेवासे) येथे फेकून देण्यात आले. नेवासे पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने अवघ्या चोवीस तासांत दोन खुनाचे प्रकार उघड केले.

नेवासे तालुक्यातील जळके शिवारात कालव्यानजीक असलेल्या एका खड्डय़ात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केली असता गळा आवळून खून केल्याचा अहवाल मिळाला होता. नेवासे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार कैलास साळवे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून एक नव्हे तर दोन खून पोलिसांनी उघड केले.

मृतदेह आढळल्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील,उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी घटनास्थळाची पाहणी  केली. खुनाच्या तपासासाठी नेवासे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा अशा दोन पथकांकडून तपास सुरू केला. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच अपर पोलीस अधीक्षिका दीपाली काळे यांच्या संगणक विभागाने तपास करून एका आरोपीचा शोध घेतला. आरोपी अमीन रज्जाक पठाण (वय ३५, रा. मज्जिद जवळ, बोलठाण तालुका गंगापूर जि. औरंगाबाद) यास ताब्यात घेऊ न गुन्ह्यबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यची कबुली दिली. रतन छबुराव थोरात (वय २८, रा.तांदुळवाडी, ता.गंगापूर), सोनाली सुखदेव थोरात (वय २२, रा.तांदुळवाडी, ता.गंगापूर, हल्ली रा.गिडेगाव ता.नेवासा) राहुल भाऊ  उचाडे (वय ५०, रा.गिडेगाव ता.नेवासा) या साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे त्याने कबूल केले.

आरोपी अमीन रज्जाक पठाण याचे आरोपी सोनाली सुखदेव थोरात हिच्याशी अनैतिक संबंध होते. सोनाली हिचा पती सुखदेव थोरात याला अनैतिक संबंधाची माहिती मिळाली होती. त्यामुळे  दि. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याचा खून करण्यात आला. सुखदेव थोरात याच्या खुनाची माहिती मंगल सोमनाथ दुशिंग हिला समजली. ती आरोपी अमीन पठाण यास ब्लॅकमेल करून पैसे मागत असे. तिच्या वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून तिचा वरील आरोपींनी खून केला.  मंगलला जोगेश्वरी-वाळुंज रस्त्यावर तिला बोलावून घेण्यात आले. गळा आवळून खून करण्यात आला. नंतर प्रेत जळके खुर्द शिवारात आणून टाकले, अशी कबुली आरोपीने दिली.

आरोपींना अटक

जळके खुर्द शिवारात सापडलेले प्रेत हे मंगल सोमनाथ दुशिंग हिचे असून तिचा खून करणारे आरोपीही पोलिसांनी शोधून काढले. या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रणजित डेरे, पोलिस हवालदार विठ्ठल गायकवाड, जयसिंग आव्हाड, कैलास साळवे, राहुल यादव, बबन तमनर, अशोक कुदाळे, भागवत शिंदे, अंकुश पोटे, केवल रजपुत, संदीप म्हस्के, कल्पना गावडे, मनीषा धाने, जयश्री काळे, चंद्रावती शिंदे यांनी खुनाचा तपास केला. एका खुनाचा शोध घेताना दोन खून पोलिसांनी उघड केले.