संभाव्य महापुराची परिस्थिती हाताळण्यासाठी बुधवारी ‘एनडीआरएफ’ची दोन पथके कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाली आहेत. त्यामध्ये ४४ जवानांचा समावेश आहे. राज्य शासनाकडून आजपासून ही पथके पुरविण्यात आली असून त्यांचा मुक्काम  ३१ ऑगस्ट पर्यंत आहे.

पोलीस निरीक्षक नितेशकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही दोन्ही पथके कार्यरत असणार आहेत. यातील एक पथक शिरोळ तालुक्यासाठी आणि दुसरे पथक कोल्हापूर येथे असणार आहे. प्रत्येक पथकात २२ जवान, २ बोटी, ५० लाईफ जॅकेट, १० लाईफ रिंग आहेत.

कोल्हापूर शहर पथकासाठी महापालिका मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, शिरोळसाठी तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांची संपर्क अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी आज दिली.