पुणे जिल्ह्य़ातील ताम्हिणी आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील इशापूर या दोन नव्या अभयारण्यांना राज्य वन्यजीव मंडळाने मंजुरी दिली असून, त्यांच्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे.
इशापूर हे पक्ष्यांसाठीचे अभयारण्य असून, ते ४० चौरस किलोमीटर क्षेत्रावर असेल. पुणे जिल्ह्य़ातील ताम्हिणी अभयारण्य हे विविध प्रकारच्या वन्यजीवांसाठी असेल. त्यात शेकरू या आपल्या राज्य प्राण्याचाही समावेश आहे. त्याचे क्षेत्रफळ ४९ चौरस किलोमीटर असेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले. या वेळी वनमंत्री पतंगराव कदम, वन विभागाचे सचिव प्रवीणसिंह परदेशी व इतर अधिकारी उपस्थित होते.
कालव्यांवर वन्यजीवांसाठी पूल
विदर्भात अनेक ठिकाणी सिंचन प्रकल्प आणि त्यांच्या रुंद कालव्यांमुळे वाघ व इतर प्राण्यांच्या फिरण्याला अडथळे येत आहेत. त्यात अडकून काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याचीही उदाहरणे आहेत.
ही बाब लक्षात घेऊन वन्यजीवांना कालवे सहज ओलांडता यावे म्हणून जागोजागी पूल उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी काही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी ठरविण्यात येत आहेत. त्याबाबत सिंचन विभागाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भात वन विभागामुळे अडलेले काही सिंचन प्रकल्पांना आता मान्यता देण्यात आली आहे. त्यात वाशिम जिल्ह्य़ातील कारंजालाड येथील रापेरी लघु प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय पेंच-खिंडसी फीडर कालव्याचा तज्ज्ञांकडून अभ्यास करून त्यावर निर्णय घेतला जाईल.

नुकसानभरपाई आता ५ लाखांवर
वन्यजीवांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाली तर दिली जाणारी नुकसानभरपाई वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत २ लाख इतकी असलेली रक्कम ५ लाख करण्यात आली आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.