05 June 2020

News Flash

सातारा जिल्ह्य़ात दोन नवे रुग्ण; ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू हृदयविकारामुळे

साताऱ्यात आतापर्यंत करोना बाधित दोन रुग्णांवर उपचार सुरू होते

संग्रहित छायाचित्र

सातारा येथे नकारात्मक अहवाल आलेल्या करोना बाधित रुग्णाचा आज येथे मृत्यू झाला. त्यांचा हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांच्या करोनाच्या पार्श्वभूमीमुळे या मृत्यूने सातारा जिल्ह्य़ात काही काळ खळबळ उडाली होती. दरम्यान करोनाचे जिल्ह्य़ात नवे दोन रुग्ण मिळाले आहेत. दोघेही रुग्ण हे मेढा तालुक्यातील वडील आणि मुलगा आहेत.

साताऱ्यात आतापर्यंत करोना बाधित दोन रुग्णांवर उपचार सुरू होते. ते कालच या आजारातून मुक्त झाल्याचे त्यांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मृत व्यक्तीचा आज सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाल्याने काही काळ खळबळ उडाली होती.

संबंधित ६३ वर्षीय व्यक्ती कॅलिफोर्नियाहून प्रवास करत साताऱ्यात आली होती. त्यांच्यावर मागील चौदा दिवस सातारा जिल्हा रुग्णालयात विशेष कक्षात उपचार सुरू होते. या उपचाराला ते प्रतिसाद देत होते. रविवारी त्यांची करोना चाचणीही नकारात्मक आल्याचे अहवाल प्राप्त झाले. मात्र आज सकाळी तोल जाऊन खाली कोसळले. यानंतर डॉक्टरांनी प्रयत्न केला परंतु त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितला.  मृत व्यक्तीच्या घशातील स्रावाचा नमुना सोमवारी पुन्हा तापसणीसाठी पाठविण्यात आला असून हा अहवाल प्राप्त झाल्यावरच मृत्यूबद्दल नेमकी माहिती समजू शकेल असेही ते म्हणाले.

दरम्यान करोनाचे जिल्ह्य़ात नवे दोन रुग्ण मिळाले आहेत. रविवारी मेढा तालुक्यातील एका व्यक्तीला करोना झाल्याचे स्पष्ट झाले. आज त्याच्या मुलालाही हा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. मेढय़ातील ही व्यक्ती मुंबईतील टॅक्सी चालक असून ती काही दिवसांपूर्वी त्यांच्या गावी परत आली होती. गेल्या काही दिवसांत त्यांना त्रास जाणवू लागल्याने तपासणी केल्यावर त्यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज त्यांच्या मुलाचा तपासणी अहवालही सकारात्मक आल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान या गावाला पोलिसांनी वेढा घातला असून नागरिकांच्या हालचालींवर संपूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत.

अंत्यसंस्काराला विरोध

दरम्यान करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीमुळे आज झालेल्या मृत्यूनंतर सातारा जिल्ह्य़ात काही काळ खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीवरील अंत्यसंस्काराला साताऱ्यातील संगम माहुली ग्रामस्थांनी विरोध केला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत आदेश काढल्याने पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 12:12 am

Web Title: two new patients in satara district that patient died of a heart attack abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 नागपुरात करोनाचा पहिला बळी
2 Coronavirus: पालघर जिल्ह्यात २० लाखांचा सॅनिटायझरचा साठा जप्त
3 Coronavirus: बीडवासियांची धाकधूक संपली; ‘त्या’ २९ पोलिसांच्या चाचण्या निगेटिव्ह
Just Now!
X