दोन लाख रुपये किमतीचे ७ तोळे सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी सीमा रामचंद्र पाटोळे (वय २०, रा. बेलवडे, हवेली) व ते सोने विकत घेणारा युवक फिरोज ईस्माईल सातवीकर (वय २३, मूळ रा. चिपळूण, हल्ली रा. सासपडे, ता. सातारा) या दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. न्यायालयाने या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हा गुन्हा २४ तासांत उघडकीस आणण्यात तळबीड पोलिसांना यश आले आहे.
कराड तालुक्यातील बेलवडे हवेली येथील सिंधूताई पवार यांच्या राहत्या घरातून १२ ते १७ जूनदरम्यान भांडय़ाच्या रॅकमध्ये ठेवण्यात आलेल्या डब्यातील सुमारे २ लाख रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. त्याबाबत पवार यांनी तळबीड पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर तळबीड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी घटनास्थळावर भेट देऊन तेथून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तपास केला व चोरी करणारी महिला सीमा पाटोळे हिच्याकडे चौकशी करत हा गुन्हा उघडकीस आणला. सीमा पाटोळेने चोरलेले दागिने सासपडे येथील फिरोज सातवीकर या युवकाला दिले असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी फिरोज याला ताब्यात घेऊन चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला.