उस्मानाबादमध्ये एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही आपल्याला आमिष दाखवून बलात्कार केल्याचे पीडित मुलीने आपल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात १४ वर्षांची पीडित मुलगी राहते, ती सध्या ७ महिन्यांची गरोदर आहे.

याप्रकरणी या मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनंतर दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. सुधाकर साखरे आणि प्रशांत कलकेरी या दोघांनीही आपल्यावर आमिष दाखवून बलात्कार केल्याचे पीडित मुलीने म्हटले आहे.

सुधाकर साखरेने, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तू जे काही मागशील ते मी तुला देईन असे सांगून बलात्कार केला, तर प्रशांत कलकेरीने तुला मोबाईल घेऊन देतो असे सांगून बलात्कार केला असा जबाब या पीडित मुलीने नोंदवला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्राकांत खांडवी, उमरगा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी सुशीला कोल्हे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी विशेष पथकासह या मुलीचा जबाब इनकॅमेरा नोंदवला आहे. त्यानंतर या दोन्ही नराधमांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.